Latest News

‘पीछे तो देखो…’ फेम अहमद शाहच्या भावाचं हृदयविकाराने निधन; अवघ्या 15 व्या वर्षी उमर शाहचा दुर्दैवी अंत

इस्लामाबाद : सोशल मीडियावर आपल्या निरागस हास्याने आणि “पीछे तो देखो…” या गाजलेल्या रीलमुळे लोकप्रिय झालेल्या पाकिस्तानातील लहानग्या अहमद शाहच्या भावाचं, अवघ्या १५ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. उमर शाह असं त्याचं नाव असून, सोमवारी पहाटे डेरा इस्माईल खान येथे ही दुर्दैवी घटना घडली. या बातमीने पाकिस्तानमधील मनोरंजनसृष्टी आणि सोशल मीडिया दोघांनाही हादरवून टाकलं आहे.

उलट्या आणि फुफ्फुसात पाणी, त्यातूनच हृदयविकाराचा झटका

Dawn या पाकिस्तानी वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, उमरला काल रात्रीपासून उलट्या होत होत्या. मेडिकल रिपोर्टनुसार, त्याच्या फुफ्फुसात द्रव शिरल्यामुळे श्वास घेण्यात अडचण निर्माण झाली आणि यामुळेच त्याला हृदयविकाराचा तीव्र झटका आला. काही दिवसांपूर्वी घरात विषारी साप सापडल्याची घटना घडली होती, मात्र त्याचा या मृत्यूशी थेट संबंध असल्याची खात्री झालेली नाही.

कुटुंबातील दुसरा मोठा आघात

ही कुटुंबासाठी दुसरी मोठी दु:खद घटना ठरली आहे. नोव्हेंबर २०२३ मध्ये त्यांनी आपल्या धाकट्या बहिणी, आयेशाला गमावलं होतं. आणि आता उमरचा अचानक झालेला मृत्यू त्यांच्या दुःखात भर घालणारा ठरला आहे.

अहमद शाहने दिली सोशल मीडियावर माहिती

अहमद शाहने इंस्टाग्रामवर एक भावनिक पोस्ट शेअर करत उमरच्या निधनाची माहिती दिली.

“आमचा लाडका छोटा उमर शाह अल्लाहकडे परतला आहे. कृपया सर्वांनी आमच्यासाठी आणि त्याच्यासाठी दुआ (प्रार्थना) करा,”
असं अहमदने लिहिलं. ही पोस्ट वाचून लाखो चाहत्यांनी दुःख व्यक्त केलं आहे.

उमरची लोकप्रियता आणि ‘जीतो पाकिस्तान’ शोमधील उपस्थिती

उमर शाहने आपल्या भावासोबत ARY Digital वरील ‘जीतो पाकिस्तान’, ‘शान-ए-रमजान’ यांसारख्या लोकप्रिय कार्यक्रमांतून प्रेक्षकांची मनं जिंकली होती. त्यांच्या मासूम चेहऱ्यामुळे आणि खोडकर बोलण्यामुळे तो सोशल मीडिया सेन्सेशन बनला होता. वेगवेगळ्या पोशाखांत दिसणाऱ्या या भावांनी “पीछे तो देखो” सारख्या रीलमधून इंटरनेटवर धुमाकूळ घातला होता.

सेलिब्रिटींचा शोक

उमरच्या निधनाने पाकिस्तानातील अनेक सेलिब्रिटी हळहळले आहेत.

फहाद मुस्तफा (जीतो पाकिस्तान सूत्रसंचालक) यांनी “मी निशब्द आहे…” अशा शब्दांत शोक व्यक्त केला.

अभिनेता अदनान सिद्दीकी यांनी उमरला “प्रकाश, आनंद आणि निरागसतेचा किरण” असं म्हटलं.

वसीम बदामी (शान-ए-रमजान) यांनी डॉक्टरांशी चर्चा करून उमरच्या निधनाची बातमी स्पष्ट केली.

एक मासूम तारा हरपला…

उमर शाह हा केवळ सोशल मीडियाचा चेहरा नव्हता, तो लाखो लोकांच्या हृदयात स्थान मिळवणारा निष्पाप बालकलाकार होता. त्याचं हसतंमुखं चेहरा, निखळ बोलणं आणि कुटुंबासोबतची केमिस्ट्री आजही चाहत्यांच्या लक्षात आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button