अमरावतीमध्ये 28 जन्म-मृत्यू प्रमाणपत्रे रद्द.

अमरावती : अमरावतीमध्ये भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पोलीस आयुक्त अरविंद चावरिया आणि इतर महसूल अधिकाऱ्यांसोबत संयुक्त बैठक घेतली. या बैठकीचा मुख्य उद्देश 28 बनावट जन्म आणि मृत्यू प्रमाणपत्रांवर कारवाई करणे हा होता. 19 ऑगस्ट 2023 ते 30 डिसेंबर 2024 या कालावधीत जारी करण्यात आलेली ही सर्व प्रमाणपत्रे रद्द करण्याचे आदेश नगरपंचायत, नगरपरिषद आणि महानगरपालिकांना देण्यात आले आहेत.
सोमय्या यांनी सांगितले की, ही प्रमाणपत्रे बनावट असल्याचा संशय होता आणि त्याची सखोल चौकशी करण्यात आली. चौकशीनंतर ही प्रमाणपत्रे कोणत्याही शासकीय किंवा निमशासकीय कामांसाठी वापरता येणार नाहीत, असे स्पष्ट करण्यात आले आहे. या निर्णयामुळे बनावट कागदपत्रे वापरणाऱ्यांवर कायदेशीर कारवाईचा बडगा उगारला जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. या प्रकरणाची पुढील चौकशी सुरू असून, यात दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल असेही सांगण्यात आले आहे.



