मंत्री नितेश राणे यांच्या विघातक वक्तव्यांवर यशोमती ठाकूरांचा संताप
केरळ राज्याबाबत मंत्री नितेश राणे यांनी केलेल्या समाजविघातक विधानावर माजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. राणे यांनी केरळ राज्याला “मिनी पाकिस्तान” संबोधून तेथील वायनाड मतदारसंघातून काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी निवडून येतात, असे वादग्रस्त विधान केले होते.
यशोमती ठाकूर यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया देताना भाजप नेत्यांवर जोरदार हल्ला चढवला. त्या म्हणाल्या,
“गांधी परिवाराने दहशतवादाचा सामना जवळून केला आहे. आपल्या परिवारातील दोन सदस्य गमावणाऱ्या या कुटुंबावर आरोप करताना भाजपच्या नेत्यांनी मर्यादा पाळली पाहिजे. आपल्या देशातील केरळ हे शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक प्रगतीत अग्रस्थानी असलेलं राज्य आहे. अशा राज्याला दहशतवादाशी जोडणं हा केरळच्या जनतेचा अपमान आहे.
”यशोमती ठाकूर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट इशारा देत म्हटलं की,
“कोंबडी चोर-मंगळसूत्र चोरांच्या जीवावर फालतू राजकारण करणाऱ्या नेत्यांना लगाम घाला. भाजपने आपल्या बोलघेवड्या नेत्यांना आवर घालण्याची गरज आहे.” तसेच, त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडेही सवाल उपस्थित करत विचारले की, “आपल्याच देशातील एक राज्य जर दहशतवादी असेल, तर मग केंद्रीय गृहमंत्री अमित शहा काय करत आहेत?”
केरळसारख्या प्रगत राज्याला अशा प्रकारे बदनाम करणाऱ्या वक्तव्यांवर नितेश राणे यांनी माफी मागावी, अशी मागणी यशोमती ठाकूर यांनी केली आहे.
“देशाच्या एकतेसाठी विघातक भूमिका घेणाऱ्या नेत्यांवर कठोर कारवाई होणं गरजेचं आहे,” असंही त्यांनी स्पष्ट केलं.



