अमरावती महानगरपालिकेत संविधान दिन उत्साहात; उद्देशिकेचे सामूहिक वाचन

उपमहापौर सचिन भेंडे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम; आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले यांच्यासह पदाधिकारी, नगरसेवक आणि अधिकारी-कर्मचाऱ्यांची उपस्थिती
अमरावती : भारतीय संविधान दिनानिमित्त गुरुवारी, २६ नोव्हेंबर रोजी अमरावती महानगरपालिकेच्या वतीने संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात सकाळी ११ वाजता आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपमहापौर सचिन भेंडे होते. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

कार्यक्रमाला महानगरपालिका आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले, स्थायी समिती सभापती अविनाश मार्डीकर, सभागृह नेते चेतन गावंडे, विरोधी पक्षनेते विलास इंगोले, झोन सभापती स्वाती कुलकर्णी, इस्माईल कासम लालुवाले, महिला व बालकल्याण समिती सभापती ममता आवारे यांच्यासह नगरसेवक उपस्थित होते.

यावेळी उपस्थित पदाधिकारी, नगरसेवक, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन केले. संविधानाने देशातील प्रत्येक नागरिकाला दिलेले न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मूल्यांचे स्मरण करून संविधानाप्रती आदर व्यक्त करण्यात आला.
या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे अभिनेता सर्जेराव गलपट यांनी सादर केलेले संविधान दिनावर आधारित गीत. तसेच त्यांनी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची वेशभूषा धारण करून कार्यक्रमाला उपस्थिती लावली. त्यांच्या सादरीकरणातून संविधानाचे महत्त्व आणि बाबासाहेबांच्या विचारांचा संदेश देण्यात आला.
यावेळी महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त महेश देशमुख, शिल्पा नाईक, उपायुक्त नरेंद्र वानखडे, योगेश पिठे, मुख्य लेखापरीक्षक श्यामसुंदर देव, सहाय्यक आयुक्त भूषण पुसतकर, नगरसचिव अक्षय निलंगे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, अभियंते, कर्मचारी आणि मान्यवर उपस्थित होते.
संविधान दिनाच्या निमित्ताने महानगरपालिकेत आयोजित या कार्यक्रमातून भारतीय संविधानातील लोकशाही मूल्यांचे जतन करण्याचा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा संदेश देण्यात आला.



