citynewslatestnewss breakingnewsMaharashtraNagpur

संविधान वाचवण्यासाठी देशभरातून आवाज उठतोय; आवाज दाबण्याचा प्रयत्न केल्यास तो आणखी बुलंद होईल – प्रकाश राज

संविधान दिनानिमित्त नागपुरात संविधान बचाव कार्यक्रमाचे आयोजन; आंदोलनकर्त्यांवरील निर्बंधांवरून सरकारवर टीका, ‘आजचा युवक शिक्षण, आरोग्य आणि रोजगाराच्या मुद्द्यांवर बोलतोय’

नागपूर : संविधान दिनानिमित्त देशभरात संविधान आणि लोकशाही वाचविण्याचा आवाज बुलंद होत असून, संविधानाने नागरिकांना दिलेले अधिकार सुरक्षित ठेवण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घेणे गरजेचे आहे, असे मत सिनेअभिनेते प्रकाश राज यांनी व्यक्त केले. संविधान दिन हा देशासाठी आनंदाचा आणि उत्सवाचा दिवस असल्याचे सांगत नागपुरात आयोजित संविधान बचाव कार्यक्रमाच्या माध्यमातून संविधानिक मूल्यांच्या संरक्षणाचा संदेश दिला जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

देशात सध्या विविध मुद्द्यांवर नागरिक आणि युवकांकडून आवाज उठविला जात आहे. मात्र, हा आवाज दाबण्याचे प्रयत्न होत असल्याचा आरोप प्रकाश राज यांनी केला. एखाद्याचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला, तर तो आणखी ताकदीने उमटेल, असा इशाराही त्यांनी दिला. आजचा युवक शिक्षण, आरोग्य आणि रोजगार यांसारख्या मूलभूत प्रश्नांवर बोलत असून, या प्रश्नांना वाचा फोडणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

सौरभ दास यांना देण्यात आलेल्या नोटीससंदर्भात बोलताना प्रकाश राज यांनी देशाबाहेर जाण्यावर घातल्या जाणाऱ्या निर्बंधांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. अलीकडच्या काळात अनेकांना विमानतळावर किंवा विमानातच ताब्यात घेतले जात असल्याच्या घटना घडत असल्याचा दावा त्यांनी केला. ध्रुव राठी यांनाही झोपेतून उठवून नेल्याचा उल्लेख करत, तिरंगा फडकविण्यासाठीही अडवले जात असल्याची टीका त्यांनी केली. युवकांच्या सक्रियतेमुळे सरकार घाबरत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

सोशल मीडियावरही निर्बंध लादून नागरिकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत असल्याचे ते म्हणाले. शांततापूर्ण आंदोलनांना रोखण्यासाठी ‘पीस बॉण्ड’चा आधार घेतला जात असल्याचा आरोप करत, अशा प्रकारच्या कारवाया म्हणजे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी म्हटले. मात्र, आंदोलन थांबणार नसून दोन दिवस विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा नव्या जोमाने आवाज उठविला जाईल, अशी भूमिका त्यांनी मांडली.

दरम्यान, नागपुरात संविधान बचाव कार्यक्रमासाठी ठिकाणाची निवड केल्याबाबत विचारले असता, ‘नागपूर भारतात आहे, पाकिस्तानात नाही,’ असे रोखठोक उत्तर प्रकाश राज यांनी दिले. त्यांच्या या विधानाची उपस्थितांमध्ये चर्चा रंगली.

संविधान दिनाच्या निमित्ताने नागपुरात झालेल्या या कार्यक्रमातून संविधानिक अधिकार, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि लोकशाहीच्या संरक्षणाचा मुद्दा केंद्रस्थानी आला. प्रकाश राज यांनी विविध मुद्द्यांवरून सरकारवर केलेल्या टीकेमुळे या कार्यक्रमाला राजकीय आणि सामाजिक महत्त्व प्राप्त झाले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button