citynewsMaharashtraMaharashtra PoliticsNagpurNagpurPolice

सत्ता सरकारकडे असली तरी संविधान आमच्या बाजूने; अभिजीत दिपकेंचा सरकारवर निशाणा

संविधान आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी नागपुरात आज ‘संविधान बचाव, लोकशाही बचाव’ रॅली; उद्यापासून दुष्काळग्रस्त भागांचा दौरा करून शेतकऱ्यांशी साधणार संवाद

नागपूर : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला संविधान दिले, त्यामुळे आजचा दिवस देशातील प्रत्येक नागरिकासाठी पवित्र असल्याचे सांगत अभिजीत दिपके यांनी दीक्षाभूमी येथे अभिवादन केले. यावेळी त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या कारभारावर टीका करत संविधान आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी जनतेने पुढे येण्याचे आवाहन केले.

आज सायंकाळी नागपुरात ‘संविधान बचाव, लोकशाही बचाव’ रॅलीची सुरुवात करण्यात येणार असून, या कार्यक्रमात आशुतोष रांका आणि अभिनेते प्रकाश राज सहभागी होणार असल्याची माहिती दिपके यांनी दिली. जे लोकशाहीत प्रश्न विचारतात आणि जनतेचे प्रश्न मांडतात, त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सरकारकडून होत असल्याचा आरोप त्यांनी केला. सत्ता सरकारच्या हातात असली, तरी बाबासाहेबांचे संविधान आमच्या बाजूने असल्याचे सांगत कोणताही हुकूमशहा जनतेचे अधिकार संपविण्याचा प्रयत्न करेल, तेव्हा संविधानच त्या अधिकारांचे संरक्षण करेल, असे ते म्हणाले.

तिरंगा फडकविल्यामुळे आशुतोषला आठ दिवस तिहार तुरुंगात ठेवण्यात आले, तर आपल्यालाही एक दिवस अटक झाली होती. मात्र, संविधानामुळेच आम्हाला न्याय मिळाला, असा दावा करत प्रत्येक नागरिकाचे अधिकार सुरक्षित ठेवण्यासाठी संविधानाचे रक्षण करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. संविधान टिकले नाही, तर भारत देशही टिकणार नाही, असे परखड मत त्यांनी व्यक्त केले.

आशुतोषला विमानतळावर अडविल्याचा आरोप

लंडन दौऱ्यासाठी आपल्यासह आशुतोष आणि सौरभ यांना आमंत्रण होते. मात्र, राज्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन आशुतोष लंडनला जाईल आणि आपण येथेच राहून शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर काम करू, असे ठरले होते. परंतु, आशुतोषला विमानतळावरच अडविण्यात आल्याचा आरोप दिपके यांनी केला. काही लोकांना जगभरात केवळ आपणच फिरावे, असे वाटते. त्यामुळे इतरांना संधी मिळाल्याचे त्यांना दुःख होत असावे, अशी टीकाही त्यांनी केली.

आपल्याला कुठेही बोलावले जात नसताना २७ वर्षांच्या तरुणांना लंडन आणि ऑक्सफर्ड विद्यापीठात व्याख्यानासाठी आमंत्रित केले जात आहे, ही बाब काही लोकांना खटकत असल्याचे ते म्हणाले. ही केवळ ईर्ष्या असल्याचा आरोप करत त्यांनी परदेश दौऱ्यांवरून होणाऱ्या टीकेलाही प्रत्युत्तर दिले. कोणत्याही जाती-धर्मातील व्यक्तीला दर्जेदार शिक्षण मिळाले पाहिजे. प्रत्येक नागरिकाने शिक्षित होणे गरजेचे असून, शिक्षणातूनच जबाबदार नागरिक घडतात, हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विचार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

वैयक्तिक आरोपांना महत्त्व देत नाही

आपल्याला कोण काय प्रमाणपत्र देते, याची चिंता नसल्याचे सांगत दिपके म्हणाले की, आपण या देशाचे नागरिक आहोत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पाहिलेले स्वप्न आणि त्यांनी दिलेले संविधान वाचविण्यासाठीच आपण काम करत आहोत. त्यामुळे वैयक्तिक आरोपांपेक्षा संविधान आणि नागरिकांच्या अधिकारांचा मुद्दा अधिक महत्त्वाचा असल्याचे त्यांनी सांगितले.

उद्यापासून दुष्काळग्रस्त भागांचा दौरा

संविधान बचाव रॅलीनंतर उद्यापासून दुष्काळग्रस्त भागांचा दौरा करून शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेणार असल्याचे दिपके यांनी सांगितले. शेतकऱ्यांच्या मुलांशीही संवाद साधण्यात येणार आहे. शेतीत प्रचंड कष्ट करूनही शेतकऱ्यांच्या हातात काहीच उरत नसल्याची विदारक परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या अडचणी प्रत्यक्ष जाणून घेण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

‘गोकुळ’ प्रकरणावरूनही सरकारला सवाल

‘गोकुळ’मध्ये घडलेला प्रकार अत्यंत वाईट असल्याची प्रतिक्रिया देत दिपके यांनी या प्रकरणावरूनही प्रश्न उपस्थित केले. एका वकिलाला ८० लाख रुपये दिले जात असल्याचे आपण ऐकले असल्याचे सांगत, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना किती मदत मिळते, असा सवाल त्यांनी केला. सत्ता मिळविण्यासाठी वकिलांवर ८० ते ९० लाख रुपये खर्च केले जात असतील, तर शेतकऱ्यांच्या वाट्याला केवळ पाच हजार रुपये का, असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी सरकारच्या प्राधान्यक्रमावर टीका केली.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button