रामटेक गड मंदिरात टिपूर दहन सोहळा उत्साहात; १२ हजारांहून अधिक रामभक्तांची उपस्थिती

श्रीराम-लक्ष्मण मंदिराच्या घुमटावर मध्यरात्री पारंपरिक पद्धतीने टिपूर दहन; महिनाभर चाललेल्या काकड आरती पर्वाची भक्तिमय वातावरणात सांगता
रामटेक (नागपूर) : नागपूर जिल्ह्यातील रामटेक येथील ऐतिहासिक गड मंदिर परिसरात टिपूर दहन सोहळा मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला. रोषणाईने उजळलेल्या श्रीराम आणि लक्ष्मण मंदिराच्या घुमटावर मध्यरात्री बारा वाजता पारंपरिक पद्धतीने टिपूर दहन करण्यात आले. या ऐतिहासिक धार्मिक सोहळ्याला सुमारे १२ हजारांहून अधिक रामभक्तांची उपस्थिती होती.

टिपूर दहन सोहळ्यानिमित्त रामटेकमध्ये भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या शोभायात्रेत रामटेक शहरासह मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि विदर्भातील विविध भागांतून आलेल्या रामभक्तांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. भक्तिमय वातावरणात निघालेल्या शोभायात्रेने गड मंदिर परिसर गाठल्यानंतर संपूर्ण परिसर रामनामाच्या जयघोषाने दुमदुमून गेला.
रात्री बारा वाजण्याच्या सुमारास मंदिरातील पुजाऱ्यांनी श्रीराम आणि लक्ष्मण मंदिराच्या घुमटावर चढून पारंपरिक पद्धतीने टिपूर दहन केले. हा क्षण पाहण्यासाठी हजारो भाविकांनी मंदिर परिसरात गर्दी केली होती. टिपूर दहनानंतर रामटेक शहरात नागरिकांनी आकर्षक आतषबाजी करत उत्सवाचा आनंद साजरा केला. रोषणाई, आतषबाजी आणि रामभक्तांच्या उत्साहामुळे संपूर्ण रामटेक शहरात उत्सवाचे वातावरण निर्माण झाले होते.
या टिपूर दहन सोहळ्याने महिनाभर सुरू असलेल्या काकड आरती पर्वाची भक्तिमय वातावरणात सांगता झाली. महिनाभर पहाटेच्या काकड आरतीमध्ये सहभागी झालेल्या भाविकांसाठी हा सोहळा विशेष महत्त्वाचा ठरला.
दरम्यान, मोठ्या संख्येने भाविकांची उपस्थिती लक्षात घेता पोलिस प्रशासनाकडून मंदिर परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. गर्दीचे नियोजन आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस यंत्रणा सतर्क होती. पारंपरिक धार्मिक उत्साह, हजारो भाविकांची उपस्थिती आणि आकर्षक आतषबाजी यामुळे रामटेकमधील टिपूर दहन सोहळा संस्मरणीय ठरला.
सिटी न्यूजसाठी रामटेक येथून प्रतिनिधी अजय मेहरकुळे.
बाईट :
- मंदिर पुजारी
- रमेश बरकते, उपविभागीय पोलीस अधिकारी
- रामभक्त



