citynewsMaharashtraNagpur

दुष्काळाच्या प्रश्नावर राजकारण नको; शेतकऱ्यांच्या मागण्यांवर चर्चेस सरकार तयार – चंद्रशेखर बावनकुळे

चारा टंचाई, कर्जमाफी आणि मायक्रो फायनान्सच्या प्रश्नांचा दुष्काळ समितीच्या बैठकीत आढावा; फार्मर आयडीसाठी ३० नोव्हेंबरपर्यंत मुदत

नागपूर : राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारकडून विविध उपाययोजनांचा आढावा घेतला जात आहे. चालू आठवड्यात आणि आगामी आठवड्यात कोणत्या उपाययोजना राबवायच्या, कोणत्या जिल्ह्यात दुष्काळाची परिस्थिती कशी आहे आणि जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त अहवालानुसार कोणते निर्णय घेता येतील, यावर दुष्काळ समितीच्या बैठकीत चर्चा होत असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपुरात दिली. चारा टंचाई, कर्जमाफी, मायक्रो फायनान्ससह शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांचा या बैठकीत आढावा घेतला जात असल्याचे त्यांनी सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी मोर्चाची घोषणा केली आहे. यावर प्रतिक्रिया देताना बावनकुळे यांनी रोहित पवार यांनीही दुष्काळ समितीच्या बैठकीला उपस्थित राहून आपले मुद्दे मांडावेत, असे आवाहन केले. सरकार त्यांच्या सर्व मागण्यांवर चर्चा करण्यास सकारात्मक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मोर्चा राजकीय स्वरूपाचा असेल तर त्याला हरकत नाही; मात्र शेतकऱ्यांना जाणीवपूर्वक संभ्रमात टाकणे आणि त्यांची मानसिक स्थिती कमकुवत करणे योग्य नाही. दुष्काळाच्या गंभीर प्रश्नावर राजकारण होऊ नये. शेतकऱ्यांच्या कोणत्याही मागणीवर चर्चा करण्यासाठी सरकार बैठक घेण्यास तयार असल्याचेही त्यांनी नमूद केले.

फार्मर आयडी नसल्याने पाच हजारांची मदत रखडली

शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या पाच हजार रुपयांच्या मदतीबाबत बोलताना बावनकुळे यांनी फार्मर आयडी नसल्यामुळे काही शेतकऱ्यांच्या खात्यात अद्याप मदतीची रक्कम जमा झालेली नसल्याचे सांगितले. त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांनी ३० नोव्हेंबरपर्यंत फार्मर आयडी काढून घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. याशिवाय राज्यातील २० ते २२ लाख शेतकऱ्यांची पीक पाहणी करण्याची प्रक्रिया सुरू असून, यासंदर्भात यापूर्वीच आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांनी केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याबाबतही निर्देश देण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

संजय राऊत यांच्या आरोपांवर सावध भूमिका

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मंत्री संजय शिरसाट यांच्याबाबत केलेल्या आरोपांवर विचारले असता, या प्रकरणाची आपल्याला सध्या माहिती नसल्याचे बावनकुळे यांनी सांगितले. या प्रकरणातील नेमकी वस्तुस्थिती काय आहे, हे तपासल्यानंतरच याबाबत भाष्य करता येईल, अशी भूमिका त्यांनी मांडली.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या निवेदनावर मुख्यमंत्र्यांकडून निर्णय

राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत झालेल्या चर्चेच्या अनुषंगाने बावनकुळे म्हणाले की, संबंधितांनी सरकारकडे किंवा मुख्यमंत्र्यांकडे निवेदन दिले असल्यास मुख्यमंत्री त्यावर योग्य ती कार्यवाही करतील. मंत्रिमंडळाच्या अधिकारक्षेत्रातील विषय असल्यास त्यावर मंत्रिमंडळात निर्णय घेतला जाईल. शेतकरी असो किंवा विरोधी पक्षातील व्यक्ती, सरकारकडे एखादा प्रश्न किंवा मागणी आल्यास त्याला न्याय देण्याची जबाबदारी सरकारची असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

ड्रॅगन पॅलेसच्या विकासासाठी महसूल विभागाची जागा उपलब्ध करणार

नागपूरमधील ड्रॅगन पॅलेसच्या विकासासाठी राज्य सरकारने पुढाकार घेतला असल्याची माहितीही बावनकुळे यांनी दिली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रस्ते विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला असून, राज्य सरकारकडूनही विविध बांधकामांची कामे करण्यात आली आहेत. ड्रॅगन पॅलेसच्या नावाने मेट्रो स्टेशन करण्याबाबतही विचार सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. महसूल विभागाच्या अखत्यारीतील जागा नगरविकास विभागाला देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, संबंधित जागेवरील नगरपालिकेचे आरक्षण आणि इतर तांत्रिक बाबी तपासाव्या लागणार आहेत. ही संपूर्ण जागा नजूल आणि महसूल विभागाच्या अखत्यारीत असून, ती अधिकृतपणे उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

कोयना धरणासह वाहून जाणारे पाणी अडवण्यावर भर

राज्यातील पाण्याचा योग्य वापर करण्यासाठी वाहून जाणारे पाणी अडवणे आणि त्याचा शेतीसाठी उपयोग करणे ही सरकारची महत्त्वाची भूमिका असल्याचे बावनकुळे म्हणाले. कोयना प्रकल्प, जलविद्युत प्रकल्प तसेच नद्या आणि नाल्यांमधून वाहून जाणाऱ्या पाण्याचा योग्य विनियोग करण्यावर भर दिला जात आहे. भविष्यात महाराष्ट्राला सुजलाम-सुफलाम करण्यासाठी अशा प्रकारचे प्रकल्प महत्त्वाचे ठरणार आहेत. वाहून जाणारे पाणी पुन्हा उपलब्ध करून ते शेतकऱ्यांना देता यावे, यासाठी सरकार विविध प्रकल्प हाती घेत असल्याचे त्यांनी सांगितले.

गांधी परिवार ब्रॉडकास्टवर बावनकुळेंची टीका

गांधी परिवार ब्रॉडकास्टच्या मुद्द्यावर प्रतिक्रिया देताना बावनकुळे यांनी २० ते २५ वर्षांनंतर अशा गोष्टी आता का केल्या जात आहेत, असा सवाल उपस्थित केला. या माध्यमातून नेमके काय साध्य होणार आहे, हे समजत नसल्याचे सांगत केवळ संभ्रम निर्माण करून त्यातून काय मिळवायचे आहे, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

इंदापूर तहसीलदारांविरोधातील तक्रारींची चौकशी होणार

इंदापूर येथील भाजपच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर तहसीलदारांविरोधात अनेक तक्रारी प्राप्त झाल्याचे बावनकुळे यांनी सांगितले. या तक्रारींची आपण दखल घेतली असून, संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली जाणार आहे. चौकशीदरम्यान तक्रारींमध्ये तथ्य आढळल्यास संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल, असा इशाराही महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button