amravatiAmravati Policscitynewslatestnewss breakingnews

ऑनलाइन व्यवहार, सीडीआरचा सापळा अन् डीएनएचा फास; बाळविक्री रॅकेटचा बुरखा फाटला!

डॉ. वैशाली भोजनेच्या दाव्यांची पोलिसांकडून पडताळणी; बँक स्टेटमेंट्स, मोबाइल संभाषण आणि तांत्रिक पुरावे तपासात महत्त्वाचे, तीन बालकांचे डीएनए नमुने फॉरेन्सिक लॅबकडे

अमरावती | प्रतिनिधी

मानवी तस्करी, बालकांची खरेदी-विक्री, पोक्सो आणि अत्याचारासारख्या गंभीर गुन्ह्यांनी अमरावती शहर हादरले असताना, डॉ. वैशाली भोजनेशी संबंधित कथित बाळविक्री रॅकेटच्या तपासाला आता वेग आला आहे. फ्रेजरपुरा पोलिसांनी या प्रकरणातील आर्थिक व्यवहार, मोबाइल संभाषण आणि वैज्ञानिक पुरावे एकत्रित करण्यावर भर दिला आहे. विशेष म्हणजे, आरोपी डॉक्टरने आपण केवळ मध्यस्थाची भूमिका बजावली असून बाळांच्या खरेदी-विक्रीत आपला थेट सहभाग नसल्याचा दावा केल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, ऑनलाइन आर्थिक व्यवहार आणि कॉल डिटेल रेकॉर्ड (सीडीआर) तपासातून या दाव्यांची पोलिसांकडून कसून पडताळणी सुरू आहे.

आर्थिक व्यवहारांतून दलालीची साखळी उघड?

या प्रकरणातील तपासात पोलिसांनी पैशांच्या व्यवहारांची साखळी शोधण्यावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. डॉ. वैशाली भोजने, मेरी ऊर्फ प्रतिभा, संगीता, निर्मल सरदार या कथित मध्यस्थांमध्ये तसेच बाळ ताब्यात घेणाऱ्या दाम्पत्यांमध्ये झालेल्या ऑनलाइन आर्थिक व्यवहारांची माहिती समोर आली आहे. बँक स्टेटमेंट्स आणि मोबाइलमधील डिजिटल माहितीच्या आधारे व्यवहारांची तपासणी करण्यात येत आहे.

याशिवाय संबंधित आरोपींमध्ये झालेल्या मोबाइल संभाषणांचे सीडीआरही पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. डॉ. भोजने आणि मेरी यांच्यात सर्वाधिक संभाषण झाल्याचे सीडीआरच्या प्राथमिक तपासातून समोर आल्याची माहिती आहे. त्यामुळे या दोघांमधील संपर्क, संभाषणाचा कालावधी आणि आर्थिक व्यवहार यांची सांगड घालून तपास केला जात आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपींचे जबाब नोंदविण्यात आले असून, त्यांचे डिजिटल स्वरूपातील संकलनही ई-साक्ष अॅपमध्ये करण्यात आले आहे. आर्थिक व्यवहार आणि मोबाइल संवाद यांचे पुरावे एकत्रित करून संपूर्ण रॅकेटमधील प्रत्येकाची भूमिका निश्चित करण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे.

डीएनए चाचणीतून पालकत्वाचा उलगडा होणार!

या प्रकरणातील सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे डीएनए चाचणी. तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, कथितरीत्या विक्री झालेल्या तिन्ही बालकांचा जन्म अन्य ठिकाणी झाला असतानाही त्यांचा जन्म डॉ. भोजने यांच्या रुग्णालयात झाल्याचे भासवून अमरावती महानगरपालिकेतून जन्म प्रमाणपत्रे मिळविण्यात आल्याचा संशय आहे. त्यामुळे जन्मनोंदणी प्रक्रियेत नेमकी काय अनियमितता झाली, याचाही तपास सुरू आहे.

या पार्श्वभूमीवर तिन्ही बालकांसह त्यांना ताब्यात घेणाऱ्या तीन दाम्पत्यांचे रक्ताचे नमुने डीएनए तपासणीसाठी फॉरेन्सिक प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. या चाचणीतून जैविक पालकत्वाबाबत वैज्ञानिक निष्कर्ष समोर येण्यास मदत होणार आहे. डीएनए अहवालातून जैविक नाते सिद्ध किंवा नाकारले गेल्यास तो या प्रकरणातील महत्त्वाचा वैज्ञानिक पुरावा ठरू शकतो.

आरोपपत्रासाठी फॉरेन्सिक अहवालाची प्रतीक्षा

या संपूर्ण प्रकरणात आर्थिक व्यवहार, मोबाइल संभाषण, जन्म प्रमाणपत्रे आणि डीएनए चाचणी असे विविध पुरावे एकत्रित करण्याचे काम फ्रेजरपुरा पोलिसांकडून सुरू आहे. तपासातील वैज्ञानिक पुरावे लवकर उपलब्ध व्हावेत, यासाठी फॉरेन्सिक प्रयोगशाळेकडून अहवाल तातडीने मिळविण्याचा प्रयत्न केला जात आहे.

मानवी तस्करीच्या या गंभीर प्रकरणात प्रत्येक आरोपीची नेमकी भूमिका, बालकांची खरेदी-विक्री कशी झाली आणि या व्यवहारामागे आणखी कोणाचे जाळे कार्यरत होते, याचा उलगडा होणे महत्त्वाचे ठरणार आहे. त्यामुळे आता पोलिसांच्या तांत्रिक तपासासोबतच डीएनए अहवालाकडेही संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे. आरोपपत्र दाखल करण्याच्या दृष्टीने पोलिसांकडून पुरावे संकलित करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button