citynewsMaharashtraMaharashtra PoliticsNagpur

शिवसेना-भाजपचे नाते आणि ऋणानुबंध कायम राहावेत; दोन्ही बाजूंनी समन्वय आवश्यक – आशिष जयस्वाल

अमित शाह आणि एकनाथ शिंदे यांच्यात आत्मीयतेचे संबंध; महायुतीतील अंतर्गत स्पर्धा ही पक्षवाढीसाठी पोषक असल्याचे अर्थ राज्यमंत्री जयस्वाल यांचे मत

नागपूर | प्रतिनिधी

शिवसेना आणि भाजप हे वेगवेगळे राजकीय पक्ष असले, तरी दोन्ही पक्षांमधील नाते, ऋणानुबंध आणि परस्पर समन्वय कायम राहणे आवश्यक आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात अत्यंत आपुलकीचे आणि आत्मीयतेचे संबंध आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या नेतृत्वाबद्दल आम्हाला नितांत आदर आहे. विकसित भारत २०४७ आणि महाराष्ट्राच्या विकासाचे स्वप्न साकार करण्यासाठी आम्ही एकत्रितपणे काम करत आहोत, असे प्रतिपादन शिवसेना (शिंदे गटाचे) अर्थ राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी नागपुरात केले.

अमित शाह आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीबाबत बोलताना जयस्वाल म्हणाले की, राजकीय पक्ष वेगळे असले तरी नेतृत्वामधील आत्मीयता आणि परस्पर विश्वास महत्त्वाचा असतो. शिवसेना आणि भाजपमधील संबंध अधिक दृढ राहण्यासाठी दोन्ही बाजूंनी समन्वय ठेवणे गरजेचे आहे. महायुतीतील घटक पक्षांनी एकमेकांच्या भावना आणि भूमिका समजून घेतल्या पाहिजेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

महायुतीतील स्पर्धा ही पक्षवाढीसाठी पोषक

महायुतीमध्ये सुरू असलेल्या संघर्ष आणि अंतर्गत स्पर्धेबाबत विचारले असता जयस्वाल म्हणाले की, देशातील कोणताही राजकीय पक्ष अंतर्गत स्पर्धेपासून अलिप्त नाही. प्रत्येक राजकीय पक्षाला आपला पक्ष वाढविण्याचा आणि संघटन मजबूत करण्याचा अधिकार आहे. मात्र, ही स्पर्धा निकोप असली पाहिजे. अशा स्पर्धेमुळे प्रत्येक पक्ष अधिक जिद्दीने आणि ताकदीने काम करण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे काही प्रमाणात स्पर्धा असणे गैर नाही, असे त्यांनी सांगितले.

‘ऑपरेशन टायगर’बाबत सूचक विधान

‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चेवर भाष्य करताना जयस्वाल यांनी राजकीय भविष्याचा शोध घेणे हा प्रत्येकाचा अधिकार असल्याचे म्हटले. राजकारणात लोकप्रतिनिधी म्हणून काम करणाऱ्या प्रत्येकाला आपल्या मतदारसंघातील जनतेचे प्रश्न आणि विकासकामे मार्गी लावावी लागतात. एखादा लोकप्रतिनिधी विरोधी पक्षात असला तरी त्यात गैर काही नाही. मात्र, ज्या नेतृत्वाच्या माध्यमातून आपण राजकारण करतो, त्या नेतृत्वाकडे पुरेशी ताकद असणे आवश्यक आहे. अन्यथा मागील राजकीय इतिहासात जे घडले, त्याची पुनरावृत्ती भविष्यातही होऊ शकते, असे सूचक विधान त्यांनी केले.

रोहित पवारांना स्वतःचे नेतृत्व सिद्ध करण्याची स्पर्धा

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्या वक्तव्यांवर प्रतिक्रिया देताना जयस्वाल म्हणाले की, सध्या विरोधी पक्षातील नेतृत्वाच्या जागेवरून रोहित पवार, जितेंद्र आव्हाड आणि विजय वडेट्टीवार यांच्यात स्पर्धा सुरू असल्याचे दिसते. विरोधी पक्षातील आपले स्थान आणि नेतृत्व सिद्ध करण्यासाठी रोहित पवार विविध वक्तव्यांद्वारे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. स्वतःला इतरांपेक्षा श्रेष्ठ सिद्ध करण्याची त्यांची धडपड सुरू आहे. त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत, असा टोला त्यांनी लगावला.

बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणींना उजाळा

शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनाच्या पार्श्वभूमीवर जुन्या आठवणींना उजाळा देताना जयस्वाल भावूक झाले. १७ नोव्हेंबर २०१२ रोजी बाळासाहेब ठाकरे यांचे निधन झाले. त्या काळात १५ ते १८ नोव्हेंबर असे चार दिवस आपण मातोश्रीवर होतो. त्यांचे व्यक्तिमत्त्व, जीवनचरित्र आणि नेतृत्व जवळून अनुभवण्याची संधी मिळाली, असे त्यांनी सांगितले.

एकदा बाळासाहेबांनी स्वतः फोन करून गंमतीने ‘मला ओळखतोस का?’ असा प्रश्न विचारला होता. तो प्रसंग आजही आठवणीत असल्याचे त्यांनी सांगितले. संजय निरुपम यांच्यासोबत बाळासाहेबांच्या सान्निध्यात तासन्तास बसण्याचा योग आला. एका महान व्यक्तिमत्त्वासोबत प्रत्यक्ष वेळ घालवण्याची संधी मिळणे ही माझ्यासाठी भाग्याची बाब होती. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जागा दुसरे कोणीही घेऊ शकत नाही. त्यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची संधी मिळाली, हे माझे भाग्य असल्याचे जयस्वाल म्हणाले.

२३ नोव्हेंबर १९९६ रोजी रामटेक येथे आयोजित कार्यक्रमासाठी बाळासाहेब ठाकरे २२ नोव्हेंबरला रामटेकमध्ये मुक्कामी होते. त्यावेळी भगव्या पत्रिकेचे प्रकाशन झाले होते. त्यानंतर १६ वर्षांनी, २३ नोव्हेंबर २०१२ रोजी त्यांच्या अस्थींचे विसर्जन करण्यात आले. हा प्रसंग माझ्यासाठी अत्यंत भावनिक होता, अशी आठवणही त्यांनी सांगितली.

कान्द्री प्रकरण आणि ग्रामीण आरटीओ वसुलीची मुख्यमंत्र्यांकडून दखल

कान्द्री येथील राडा आणि आरटीओ विभागाकडून होणाऱ्या कथित वसुलीच्या मुद्द्यावर बोलताना जयस्वाल यांनी आरटीओकडून वसुली केली जात असल्याची बाब सत्य असल्याचे सांगितले. राज्यात अशा काही घटना घडत असतात; मात्र संबंधित प्रकरणाची योग्य दखल घेऊन कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

ग्रामीण भागातील आरटीओ विभागाच्या वसुलीबाबत विचारले असता, या संदर्भात मुख्यमंत्री यांनी दखल घेतली असून योग्य ती कारवाई केली जाईल, असे आश्वासनही अर्थ राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी दिले.

राजकीय समन्वय, महायुतीतील स्पर्धा, संभाव्य पक्षांतराच्या चर्चा, विरोधकांमधील नेतृत्वाची रस्सीखेच आणि आरटीओ विभागातील वसुली अशा विविध मुद्द्यांवर जयस्वाल यांनी नागपुरात आपली भूमिका स्पष्ट केली.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button