नागपुरातील एस. एच. हॉस्पिटलमध्ये ११.११ लाखांचा कथित आर्थिक गैरव्यवहार!

रुग्णांच्या बिलाची रक्कम हॉस्पिटलच्या खात्यात जमा करण्याऐवजी कर्मचाऱ्यांच्या फोन-पेवर वळती; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
नागपूर : शहरातील गंगाबाई घाट परिसरातील एस. एच. हॉस्पिटलमध्ये रुग्णांच्या बिलिंगमधील तब्बल ११ लाख ११ हजार रुपयांचा कथित आर्थिक गैरव्यवहार उघडकीस आला आहे. रुग्णांकडून मिळणारी बिलाची रक्कम हॉस्पिटलच्या अधिकृत खात्यात जमा करण्याऐवजी स्वतःच्या मोबाईलवरील फोन-पे खात्यावर आणि क्यूआर कोडद्वारे वळती केल्याचा आरोप तीन कर्मचाऱ्यांवर करण्यात आला आहे. या प्रकरणी लकडगंज पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.
या प्रकरणी भूषण भुतडा (वय २८) यांनी १५ नोव्हेंबर २०२६ रोजी लकडगंज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीनुसार, संबंधित तिन्ही आरोपी हॉस्पिटलच्या व्यवस्थापन विभागात कार्यरत होते. २४ मार्च ते २६ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत रुग्णांच्या बिलिंग आणि फार्मसी विभागातील व्यवहारांदरम्यान त्यांनी कथितरीत्या हा गैरव्यवहार केला.
रुग्णांकडून बिलाची रक्कम स्वीकारताना हॉस्पिटलच्या अधिकृत खात्याऐवजी स्वतःच्या फोन-पे खात्याचा तसेच वैयक्तिक क्यूआर कोडचा वापर करून सुमारे ११ लाख ११ हजार रुपयांची रक्कम वळती केल्याचे तक्रारीत नमूद आहे. या व्यवहारांशी संबंधित पुरावे उपलब्ध असल्याचाही दावा तक्रारदाराने केला आहे.
तक्रारीच्या आधारे लकडगंज पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८(४), ३१६(४) आणि ३(५) अंतर्गत तीन आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणातील संबंधित आर्थिक व्यवहार, बिलिंग नोंदी आणि डिजिटल पेमेंटचे पुरावे तपासले जात आहेत.
हॉस्पिटलच्या आर्थिक व्यवहारांमध्ये झालेल्या या कथित गैरव्यवहारामुळे वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. प्रत्यक्षात किती रक्कम वळती करण्यात आली, या प्रकारात आणखी कोणाचा सहभाग आहे का आणि गैरव्यवहारामागील नेमके कारण काय, हे पोलीस तपासातून स्पष्ट होणार आहे.



