citynewsMaharashtraNagpurNagpurCrimeNagpurPolice

जुन्या वादातून मित्रानेच मित्रावर धारदार शस्त्राने केला हल्ला; चेहरा आणि पाठीवर वार!

नागपुरातील मेहंदीबाग रेल्वे पटरीजवळ घटना; आरोपीवर यापूर्वी खुनाचा प्रयत्न आणि दरोड्याचे गुन्हे दाखल असल्याची पोलिसांची माहिती

नागपूर : जुन्या वादातून मित्रानेच मित्रावर धारदार शस्त्राने हल्ला केल्याची धक्कादायक घटना नागपुरात समोर आली आहे. यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मेहंदीबाग रेल्वे पटरीजवळ १० नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास ही घटना घडली. ओमकार उर्फ ओमी यादव याने करण जाधव याच्यावर धारदार शस्त्राने वार केल्याचा आरोप असून, या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ओमकार उर्फ ओमी सतीश यादव (वय २०) आणि करण प्रकाश जाधव (वय २६) हे दोघे मित्र आहेत. वैयक्तिक कारणावरून दोघांमध्ये वाद झाला. या वादाचे रूपांतर पुढे हिंसक घटनेत झाले. यावेळी ओमकार याने करणच्या चेहऱ्यावर आणि पाठीवर धारदार शस्त्राने वार करून त्याला जखमी केल्याचा आरोप आहे.

घटनेची माहिती मिळताच यशोधरानगर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून, पुरावे गोळा करण्यासाठी फॉरेन्सिक पथकालाही पाचारण करण्यात आले होते.

या प्रकरणी यशोधरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १०४९/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम १०९(१) आणि ११५(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विशेष म्हणजे, आरोपी ओमकार उर्फ ओमी यादव याच्याविरुद्ध यापूर्वीही गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. त्याच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम ३०७ अंतर्गत खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल असून, मौदा पोलीस ठाण्यातही दरोड्याचा गुन्हा नोंद असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

मैत्रीतील वैयक्तिक वादातून घडलेल्या या हल्ल्याने पुन्हा एकदा शहरातील गुन्हेगारी घटनांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास यशोधरानगर पोलीस करीत आहेत.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button