AchalpurAmravati GramincitynewsCrime Newslatestnewss breakingnews

अचलपूरमध्ये पाच लाखांची बॅग लंपास; ५० रुपयांचे आमिष दाखवून चोरट्यांचा डाव!

शेतकऱ्यांना चुकारा करण्यासाठी बँकेतून रक्कम आणणाऱ्या कर्मचाऱ्याला चोरट्यांनी बनवले लक्ष्य; परतवाडा पोलिसांकडून तपास सुरू

अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात शेतकऱ्यांना रोख चुकारा करण्यासाठी बँकेतून आणलेली पाच लाख रुपयांची रोकड चोरट्यांनी लंपास केल्याची घटना समोर आली आहे. अवघ्या ५० रुपये खाली पडल्याचे सांगून कर्मचाऱ्याचे लक्ष विचलित करण्यात आले आणि त्याच संधीचा फायदा घेत दुचाकीवरील बॅग घेऊन दोन चोरटे पसार झाले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून परतवाडा पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीतील आडते व्यापारी शाम मालू यांच्याकडे विजय धर्माळे हे कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत. गुरुवारच्या बाजारपेठेत शेतकऱ्यांना शेतमालाचा रोख चुकारा करण्यासाठी ते बँकेतून पैसे आणण्याकरिता गेले होते. बँकेतून पाच लाख रुपयांची रोकड बॅगेत घेऊन ते परतले.

यावेळी दोन चोरटे त्यांचा पाठलाग करत असल्याचे सांगण्यात येत आहे. जगदंबा चौक परिसरात पोहोचल्यानंतर या दोघांनी विजय धर्माळे यांना तुमचे ५० रुपये खाली पडले आहेत, असे सांगून त्यांचे लक्ष विचलित केले. पैसे उचलण्यासाठी धर्माळे खाली वाकताच चोरट्यांनी दुचाकीवर ठेवलेली रोकड असलेली बॅग उचलली आणि घटनास्थळावरून पळ काढला.

काही क्षणांतच पाच लाख रुपयांची रोकड लंपास झाल्याने परिसरात खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपास सुरू केला असून परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची फुटेज तपासली जात आहेत. चोरट्यांची ओळख पटवून त्यांना पकडण्यासाठी परतवाडा पोलीस प्रयत्नशील आहेत.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button