Amravaticitynews

बडगुजर स्पोर्ट्स अकॅडमीत माता ब्रह्मचारिणी देवी पूजन उत्साहात संपन्न!

लप्पी भैय्या जाजोदिया यांच्या हस्ते पूजन; नवरात्री गरबा महोत्सवातून संस्कृती, महिला सक्षमीकरण आणि सामाजिक एकतेचा संदेश

अमरावती शहरात नवरात्रोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचला असून, बडगुजर स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीने आयोजित नवरात्री गरबा महोत्सव २०२६ अंतर्गत माता ब्रह्मचारिणी देवी पूजन भक्तिमय वातावरणात संपन्न झाले. सोमवार, १२ ऑक्टोबर रोजी आयोजित या कार्यक्रमात प्रसिद्ध समाजसेवक लप्पी भैय्या जाजोदिया यांच्या हस्ते कन्यारूपातील माता ब्रह्मचारिणी देवीचे विधिवत पूजन करण्यात आले. यावेळी भाविकांनी देवीचे दर्शन घेत सुख, समृद्धी आणि सर्वांच्या कल्याणासाठी प्रार्थना केली.

बडगुजर स्पोर्ट्स अकॅडमी आणि महिला मंडळाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नवरात्री गरबा महोत्सवात धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरांचा सुंदर संगम पाहायला मिळाला. माता ब्रह्मचारिणी देवी पूजनाच्या निमित्ताने परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. प्रमुख पाहुणे लप्पी भैय्या जाजोदिया यांच्या हस्ते पूजनाचा विधी पार पडला.

या कार्यक्रमाला नगरसेविका मंजुषा जाधव आणि समाजसेवक प्रशांतजी जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच बडगुजर स्पोर्ट्स अकॅडमीच्या संचालिका डॉ. साक्षी जिंतुरकर आणि सचिव डॉ. राकेश बडगुजर यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना समाजसेवक लप्पी भैय्या जाजोदिया यांनी नवरात्री हा शक्तीच्या उपासनेचा उत्सव असल्याचे सांगितले. अशा उपक्रमांच्या माध्यमातून भारतीय संस्कृती आणि धार्मिक परंपरांचे जतन होत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

या महोत्सवातून धार्मिक श्रद्धेसोबतच महिला सक्षमीकरण, सांस्कृतिक एकता आणि सामाजिक सलोख्याचा संदेश दिला जात आहे. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. राकेश बडगुजर, गोकुळ कडू, अण्णाजी काळे, सतीश देशमुख, स्वाती कडू, प्रिया ठोकड, मयुरी पाटील, दीपाली बेडबागकर, राणी ठाकरे, राणी राऊत, सोनल पचडे, चंदा बागडे, आशा जवंजाळ, रसिका मुळे, माधुरी जोशी तसेच महिला मंडळाच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button