citynewsMaharashtraNagpurNagpur graminNagpurCrime

चोरबाहुली शिवारात २३ वर्षीय तरुणाची हत्या; दोन आरोपी अटकेत

गावी सोडण्याच्या बहाण्याने सोबत नेले; राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ लगत मृतदेह फेकल्याचा आरोप

नागपूर जिल्ह्यातील रामटेक परिसरात चोरबाहुली शिवारात २३ वर्षीय तरुणाच्या हत्येची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सावनेरहून मध्य प्रदेशातील आपल्या गावी जाणाऱ्या शिवकुमार सोनेश्वर याला गावी सोडण्याच्या बहाण्याने सोबत नेल्यानंतर त्याची हत्या करून मृतदेह महामार्गालगत फेकून दिल्याचा आरोप आहे. या प्रकरणी आकाश धुर्वे आणि विलास इनवाते या दोघांना पोलिसांनी अटक केली असून, पुढील तपास सुरू आहे.

रामटेक : सावनेरहून मध्य प्रदेशातील आपल्या गावी जाणाऱ्या एका तरुणाची हत्या करून त्याचा मृतदेह राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ लगत फेकून दिल्याची घटना उघडकीस आली आहे. शिवकुमार अनिलकुमार सोनेश्वर (वय २३, रा. परसवानी, ता. कुरई, जि. सिवनी, मध्य प्रदेश) असे मृत तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी आकाश गुणवंता धुर्वे (वय २८) आणि विलास मधुकर इनवाते (वय २८, दोघेही रा. कोथुळणा, ता. सावनेर, जि. नागपूर) यांना पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवकुमारने ५ ऑक्टोबर २०२६ रोजी अन्य दोन व्यक्तींसोबत मोटारसायकलवरून गावी जात असल्याचे छायाचित्र कुटुंबीयांना पाठविले होते. मात्र, तो घरी न परतल्याने त्याचा भाऊ जयकुमार अनिलकुमार सोनेश्वर याने ११ ऑक्टोबर रोजी सावनेर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी छायाचित्रातील व्यक्तींची चौकशी सुरू केली. चौकशीदरम्यान आकाश धुर्वे याने दिलेल्या माहितीनुसार, आकाश, विलास आणि शिवकुमार यांची ५ ऑक्टोबर रोजी सावनेर बसस्थानकावर भेट झाली होती. शिवकुमारला त्याच्या गावी सोडण्याचे सांगून तिघेही सावनेरहून मनसरमार्गे सिवनीकडे निघाले होते.

पोलिसांच्या माहितीनुसार, रात्री १० ते ११ वाजताच्या सुमारास रस्त्याच्या कडेला थांबल्यानंतर आकाश आणि विलास यांचा शिवकुमारसोबत वाद झाला. त्यानंतर दोघांनी संगनमताने शिवकुमारला हाताबुक्क्यांनी मारहाण करून खाली पाडले आणि त्याच्या डोक्यावर दगड मारून हत्या केल्याचा आरोप आहे. त्यानंतर मृतदेह रस्त्यालगतच्या खड्ड्यात फेकून दोघेही तेथून निघून गेल्याचे तपासात समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले.

या माहितीच्या आधारे १२ ऑक्टोबर रोजी सावनेर पोलिसांनी आरोपीला सोबत घेऊन चोरबाहुली शिवारातील घटनास्थळाची पाहणी केली. यावेळी तेथे शिवकुमारचा मृतदेह आढळून आला. त्याचा भाऊ जयकुमार याने मृतदेहाची ओळख पटविली. घटनास्थळ देवलापार पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याने मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नागपूर येथील मेडिकल हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आला.

या प्रकरणी देवलापार पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ५३८/२०२६ नुसार भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३(१) आणि ३(५) अंतर्गत दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दोघांना अटक करून न्यायालयासमोर हजर केले असून, त्यांचा रिमांड घेण्यात आला आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button