citynewsMaharashtraYavatmal

कासोळा देवच्या श्री महाकाली संस्थानात भाविकांची मांदियाळी! ‘जय महाकाली’च्या जयघोषाने परिसर दुमदुमला

डोंगरांच्या कुशीत वसलेल्या महाकाली मातेच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी; १९ ऑक्टोबरला अष्टमीनिमित्त महाप्रसाद आणि यज्ञाचे आयोजन

नवरात्रोत्सवाला सुरुवात होताच पुसद तालुक्यातील कासोळा देव येथील श्री क्षेत्र श्री महाकाली संस्थानात भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. निसर्गरम्य वातावरणात आणि डोंगरांच्या कुशीत वसलेल्या आई महाकालीच्या दर्शनासाठी शहरासह ग्रामीण भागातील भाविक मोठ्या संख्येने दाखल होत आहेत. ‘जय महाकाली’च्या जयघोषाने मंदिर परिसर भक्तिमय झाला असून, नवरात्रोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

पुसद : नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने सर्वत्र भक्तिमय वातावरण निर्माण झाले असताना, पुसद तालुक्यातील कासोळा देव येथील श्री क्षेत्र श्री महाकाली संस्थानातही भाविकांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. नवरात्रोत्सवाचे दोन दिवस उलटल्यानंतर आई महाकाली मातेच्या दर्शनासाठी मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होत आहे. सकाळपासूनच दर्शनासाठी भाविकांची वर्दळ सुरू असून, ‘जय महाकाली’च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून जात आहे.

पुसद शहरापासून सुमारे १२ किलोमीटर अंतरावर असलेले कासोळा देव हे निसर्गरम्य ठिकाण डोंगरांच्या कुशीत वसले आहे. याच ठिकाणी श्री क्षेत्र श्री महाकाली संस्थान, श्री श्री महर्षी मातंग ऋषी आश्रम आणि नंदलाल गोसेवा परिसरात नवरात्रोत्सवानिमित्त धार्मिक वातावरण अनुभवायला मिळत आहे. आई महाकालीच्या दर्शनासाठी पुसद शहरासह आसपासच्या ग्रामीण भागातूनही भाविक मोठ्या संख्येने येत आहेत.

मातेच्या चरणी नतमस्तक होऊन भाविकांकडून सुख, समृद्धी आणि कुटुंबाच्या कल्याणासाठी प्रार्थना केली जात आहे. श्रद्धा, भक्ती आणि उत्साहाने मंदिर परिसरात भाविकांची मांदियाळी पाहायला मिळत आहे.

दरम्यान, नवरात्रोत्सवाच्या पुढील पर्वात विशेष धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. १८ ऑक्टोबर रोजी षष्ठी आणि १९ ऑक्टोबर रोजी अष्टमीनिमित्त विविध धार्मिक विधी पार पडणार आहेत. अष्टमीच्या दिवशी विशेष यज्ञ आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात येणार असून, दुपारी १२ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत भाविकांना महाप्रसादाचा लाभ घेता येणार आहे.

परमपूज्य समर्थ सद्गुरू श्री गजानंद माऊली भक्त परिवाराच्या वतीने आयोजित या महानवरात्रोत्सवात भाविकांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे. नवरात्रोत्सवाचे पुढील दिवस आणि अष्टमीच्या पर्वावर दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button