अमरावतीत अवैध गॅस रिफिलिंगचा पर्दाफाश; ४४ सिलेंडर, ३ मशीन आणि २ वाहने जप्त

महाजनपुरा परिसरात गुन्हे शाखेची कारवाई; तब्बल ९ लाख ५९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
अमरावती शहरातील खोलापुरी गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरगुती गॅस सिलेंडरच्या अवैध रिफिलिंगचा प्रकार उघडकीस आला आहे. महाजनपुरा परिसरात गुन्हे शाखा युनिट क्रमांक एकने छापा टाकून ४४ गॅस सिलेंडर, तीन रिफिलिंग मशीन आणि दोन वाहने असा सुमारे ९ लाख ५९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. विशेष म्हणजे जप्त करण्यात आलेल्या सिलेंडरमध्ये एचपी गॅस, इंडेन आणि भारत गॅस या कंपन्यांचे सिलेंडर आढळल्याने या प्रकरणाचा तपास अधिक महत्त्वाचा ठरला आहे.

अमरावतीच्या महाजनपुरा परिसरात घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरमध्ये बेकायदेशीर पद्धतीने गॅस रिफिलिंग करून तो ग्राहकांपर्यंत पोहोचवला जात असल्याची गुप्त माहिती गुन्हे शाखा युनिट क्रमांक एकला मिळाली होती. या माहितीच्या आधारे एपीआय वाकोडे आणि एपीआय आडे यांच्या पथकाने संबंधित ठिकाणी छापा टाकून कारवाई केली.
पोलिसांनी केलेल्या तपासणीदरम्यान घटनास्थळी तीन गॅस रिफिलिंग मशीन आणि तब्बल ४४ गॅस सिलेंडर आढळून आले. याशिवाय रिफिलिंगसाठी वापरण्यात येणारे साहित्यही पोलिसांनी जप्त केले. गॅस सिलेंडरची वाहतूक करण्यासाठी वापरली जाणारी दोन वाहनेदेखील पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत.

या कारवाईदरम्यान पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनाही घटनास्थळी बोलावण्यात आले होते. त्यांच्या उपस्थितीत इन्व्हेंटरी पंचनामा करण्यात आला आणि जप्त मुद्देमालाची नोंद करण्यात आली.
पोलिसांच्या माहितीनुसार, या कारवाईत एकूण सुमारे ९ लाख ५९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. जप्त केलेल्या सिलेंडरमध्ये एचपी गॅस, इंडेन आणि भारत गॅस या कंपन्यांचे सिलेंडर आढळून आले आहेत.
त्यामुळे या अवैध रिफिलिंगच्या प्रकरणामागे नेमके कोण आहे, विविध गॅस एजन्सींचा यामध्ये काही सहभाग आहे का, तसेच या सिलेंडरचा पुरवठा नेमका कुठून आणि कुठे केला जात होता, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.
गुन्हे शाखेच्या या कारवाईमुळे घरगुती गॅस सिलेंडरच्या अवैध रिफिलिंगचा प्रकार समोर आला असून, या प्रकरणातील पुढील तपासात आणखी कोणाची नावे समोर येतात, याकडे लक्ष लागले आहे.



