citynewsLatest NewsMaharashtraWardha

वर्ध्यात वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू; ८० तास उलटूनही अंत्यसंस्कार नाहीत

रायपूर गावात वन्यप्राण्यांच्या वाढत्या दहशतीविरोधात ग्रामस्थ आक्रमक; कुटुंबाला एक कोटींची नुकसानभरपाई आणि शासकीय नोकरीसह विविध मागण्या

वर्धा : वर्धा जिल्ह्यातील रायपूर येथे वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेला तब्बल ८० तासांहून अधिक कालावधी उलटूनही मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आलेले नाहीत. मृत शेतकऱ्याच्या कुटुंबीयांना योग्य नुकसानभरपाई मिळावी आणि परिसरातील वाघाचा तातडीने बंदोबस्त करण्यात यावा, या मागण्यांसाठी ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत.

वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यानंतर गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. परिसरात वाघाचा वावर असल्याने नागरिक आणि शेतकऱ्यांमध्ये दहशत निर्माण झाली असून, शेतात जाण्याबाबतही भीती व्यक्त केली जात आहे.

ग्रामस्थांच्या विविध मागण्या

या घटनेनंतर ग्रामस्थांनी प्रशासनासमोर विविध मागण्या मांडल्या आहेत. मृतकाच्या कुटुंबीयांना एक कोटी रुपये नुकसानभरपाई देण्यात यावी, तसेच कुटुंबातील एका सदस्याला शासकीय नोकरी देण्यात यावी, अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे.

याशिवाय रायपूर परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या वाघाचा तातडीने बंदोबस्त करावा, अशीही मागणी ग्रामस्थांनी केली आहे. मृतकाच्या कुटुंबाला ग्रामपंचायत हद्दीत घरकुल उपलब्ध करून द्यावे, अशी मागणीही करण्यात आली आहे.

वाघाला जीपीएस चिप लावण्याची मागणी

परिसरात वाघाचा वावर असल्याने त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी वाघाला जीपीएस चिप लावण्यात यावी, अशी मागणीही ग्रामस्थांनी केली आहे. वाघाच्या हालचालींची माहिती वेळेवर मिळाल्यास संभाव्य दुर्घटना टाळण्यास मदत होऊ शकते, अशी ग्रामस्थांची भूमिका आहे.

अंत्यसंस्काराचा प्रश्न कायम

घटनेला ८० तासांहून अधिक काळ उलटूनही मृतदेहावर अंत्यसंस्कार न झाल्याने परिस्थिती गंभीर बनली आहे. प्रशासनाने ग्रामस्थांच्या मागण्यांवर तातडीने तोडगा काढावा आणि मृतकाच्या कुटुंबीयांना न्याय द्यावा, अशी मागणी जोर धरत आहे.

दरम्यान, वाघाच्या हल्ल्यामुळे निर्माण झालेली भीती दूर करण्यासाठी वनविभागाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button