अकोल्यात चोरांचा धुमाकूळ; धनराज ज्वेलर्समधून २२ किलो ४०० ग्रॅम चांदी लंपास

चोरीची किंमत तब्बल ४९ लाख २८ हजार रुपये; सलग दुसऱ्या दिवशी सराफा दुकानांना लक्ष्य, तीन संशयित CCTV मध्ये कैद
अकोला | प्रतिनिधी
अकोला शहरात चोरट्यांनी पुन्हा एकदा धुमाकूळ घातला असून, सिव्हिल लाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राऊतवाडी परिसरात धनराज ज्वेलर्सला चोरट्यांनी लक्ष्य केले आहे. दुकानाचे शटर आणि कुलूप तोडून चोरट्यांनी तब्बल २२ किलो ४०० ग्रॅम चांदी लंपास केली. चोरी झालेल्या चांदीची किंमत ४९ लाख २८ हजार रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
ही घटना पहाटे साडेतीन ते चार वाजण्याच्या सुमारास घडल्याची प्राथमिक माहिती आहे. दुकानाच्या परिसरातील CCTV कॅमेऱ्यांमध्ये तीन संशयित चोरटे कैद झाले आहेत. मोठ्या लोखंडी कटरच्या सहाय्याने दुकानांचे शटर आणि कुलूप तोडून आरोपींनी आत प्रवेश केल्याचे CCTV फुटेजमध्ये दिसून येत आहे.
धनराज ज्वेलर्सचे शटर तोडल्यानंतर चोरट्यांनी दुकानातील चांदीवर डल्ला मारला आणि लाखो रुपयांची चांदी घेऊन घटनास्थळावरून पसार झाले. सकाळी दुकान चालक दुकानात पोहोचले असता शटर तुटलेले आणि चांदी गायब असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर तातडीने पोलिसांना माहिती देण्यात आली.
दरम्यान, चोरट्यांनी परिसरातील खरोटे ज्वेलर्ससह आणखी एका सराफा दुकानालाही लक्ष्य केले. या दुकानांचे शटर आणि कुलूप तोडण्यात आले; मात्र अतिरिक्त सुरक्षा लॉक आणि सेंट्रल लॉकमुळे चोरट्यांना चोरी करण्यात यश आले नाही. तसेच परिसरातील एका अपार्टमेंटच्या लोखंडी ग्रीलची कडी कटरने कापून चोरीचा प्रयत्न केल्याची माहितीही समोर आली आहे.
या सर्व घटनांमुळे एकाच व्यावसायिक चोरट्यांच्या टोळीने नियोजनबद्ध पद्धतीने विविध ठिकाणी चोरीचे प्रयत्न केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे, अकोला शहरात सलग दुसऱ्या दिवशी सराफा दुकानांना लक्ष्य करण्यात आल्याने व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
घटनेची माहिती मिळताच सिव्हिल लाईन पोलिसांचे अधिकारी, वरिष्ठ पोलीस अधिकारी, फिंगरप्रिंट तज्ज्ञ आणि श्वान पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळावरून महत्त्वाचे पुरावे गोळा केले असून CCTV फुटेज ताब्यात घेत संशयितांची ओळख पटवण्याचे काम सुरू केले आहे.
या प्रकरणी सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, चोरीला गेलेल्या २२ किलो ४०० ग्रॅम चांदीची किंमत ४९ लाख २८ हजार रुपये असल्याचे नमूद करण्यात आले आहे. CCTV फुटेज आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला आहे.
सलग होणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे अकोल्यातील सराफा व्यापाऱ्यांमध्ये चिंता वाढली असून, रात्रीची गस्त वाढवावी, बाजारपेठेतील सुरक्षा व्यवस्था मजबूत करावी आणि चोरट्यांना तातडीने अटक करावी, अशी मागणी व्यापाऱ्यांकडून करण्यात येत आहे.
अकोला शहरातील सराफा दुकानांना सातत्याने लक्ष्य करणाऱ्या या टोळीचा पोलिस कधी छडा लावतात आणि आरोपी कधी जेरबंद होतात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.



