छत्रपती संभाजीनगरात भेसळयुक्त तूप-पनीर प्रकरणावर धडक कारवाई; ९५० किलो माल जप्त, डेअरीचा परवाना निलंबित

‘सेफ फूड सेफ महाराष्ट्र’ मोहिमेअंतर्गत अन्न व औषध प्रशासनाचा छापा; सुमारे ₹३.१२ लाखांचा माल जप्त
छत्रपती संभाजीनगर | प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगरमध्ये अन्न व औषध प्रशासन विभागाने ‘सेफ फूड सेफ महाराष्ट्र’ मोहिमेअंतर्गत मोठी कारवाई करत चिखलठाणा एमआयडीसी परिसरातील अमोल दूध डेरी या उत्पादन युनिटवर छापा टाकला. या कारवाईदरम्यान भेसळयुक्त तूप आणि निकृष्ट दर्जाचे पनीर तयार केले जात असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून, सुमारे ९५० किलो अन्नसाठा जप्त करण्यात आला आहे. संबंधित उत्पादन युनिटचा परवाना तात्काळ निलंबित करण्यात आला असून आस्थापना बंद करण्यात आली आहे.
अन्न सुरक्षा विभागाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. तपासणीदरम्यान अधिकाऱ्यांना मोठ्या प्रमाणात तूप, क्रीम, पनीर आणि रिफाइंड सोयाबीन तेलाचा साठा आढळून आला. कारवाईत २९९ किलो तूप, १९९ किलो क्रीम, १७४ किलो पनीर आणि २७८ किलो रिफाइंड सोयाबीन तेल असा एकूण सुमारे ९५० किलो माल जप्त करण्यात आला. या जप्त मालाची अंदाजे किंमत ३ लाख १२ हजार ३८० रुपये असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
प्राथमिक तपासात गाईच्या शुद्ध तुपामध्ये सोयाबीन तेलाची भेसळ केली जात असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. तसेच अनालॉग पनीर तयार करण्यासाठी निकृष्ट दर्जाच्या घटकांचा वापर होत असल्याची शक्यताही अधिकाऱ्यांनी वर्तविली आहे.
तपासणीदरम्यान उत्पादन युनिटमध्ये स्वच्छतेचा अभाव असल्याचे निदर्शनास आले. तसेच तेथील कामगारांकडे आवश्यक वैद्यकीय प्रमाणपत्रे उपलब्ध नसल्याचेही तपासात स्पष्ट झाले. या अनियमिततेची गंभीर दखल घेत अन्न व औषध प्रशासनाने संबंधित उत्पादन युनिटचा परवाना तात्काळ निलंबित करून आस्थापना बंद करण्याची कारवाई केली.
तपासादरम्यान संबंधित डेअरीकडून शहरातील काही किरकोळ विक्रेत्यांकडे तूप पुरवठा केला जात असल्याची माहितीही समोर आली. त्या विक्री केंद्रांवरूनही तुपाचे नमुने घेऊन प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. प्रयोगशाळेचा अंतिम अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे अन्न व औषध प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
भेसळयुक्त अन्नपदार्थांवर सुरू असलेल्या धडक कारवायांनंतरही बाजारात अशा उत्पादनांच्या विक्रीबाबत नागरिकांमध्ये चिंता कायम आहे. त्यामुळे ग्राहकांनी अन्नपदार्थ खरेदी करताना परवाना, उत्पादनाची गुणवत्ता, उत्पादन दिनांक आणि संबंधित माहितीची खातरजमा करूनच खरेदी करावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
भेसळयुक्त अन्नपदार्थ हा केवळ कायद्याचा विषय नसून तो थेट नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित गंभीर प्रश्न आहे. त्यामुळे अशा कारवायांमुळे भेसळ रोखण्यासाठी कितपत परिणामकारक बदल होतो आणि पुढील काळात प्रशासन आणखी कोणती पावले उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



