citynewsDharniLatest NewsMaharashtraMelghat

मेळघाटातील कुपोषण निर्मूलनासाठी सरकार ॲक्शन मोडमध्ये; मंत्री आदिती तटकरे यांचा धारणी दौरा

प्रत्येक अंगणवाडीस स्वतंत्र वीजमीटरचा निर्णय; सिझेरियन प्रसूतींच्या वाढत्या प्रमाणावर अहवाल सादर करण्याचे निर्देश

धारणी (जि. अमरावती) | प्रतिनिधी

मेळघाटातील कुपोषण आणि बालमृत्यू रोखण्यासाठी राज्य सरकारने उपाययोजनांना अधिक गती दिली आहे. राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी अमरावती जिल्ह्यातील धारणी तालुक्याचा दौरा करून अंगणवाडी केंद्रे आणि पोषण पुनर्वसन केंद्राची (NRC) प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी प्रत्येक अंगणवाडी केंद्राला स्वतंत्र वीजमीटर उपलब्ध करून देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर करत, मेळघाटातील सिझेरियन प्रसूतींच्या वाढत्या प्रमाणाबाबत सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

मेळघाटातील कुपोषण निर्मूलन आणि आरोग्य सेवा अधिक प्रभावी करण्याच्या उद्देशाने मंत्री तटकरे यांनी धुळघाट रोड, भोकरबर्डी, कळमखार, लवादा आणि चित्री येथील अंगणवाडी केंद्रांना भेट दिली. या दौऱ्यात त्यांनी बालके, पालक, अंगणवाडी सेविका आणि मदतनिसांशी संवाद साधून प्रत्यक्ष परिस्थितीची माहिती घेतली. तसेच उपलब्ध सुविधा, पोषण आहार आणि बालसंगोपनाच्या उपाययोजनांचाही आढावा घेतला.

यानंतर धारणी येथील पोषण पुनर्वसन केंद्राची पाहणी करून शासकीय विश्रामगृहात कुपोषण आणि बालमृत्यू संदर्भात उच्चस्तरीय आढावा बैठक घेण्यात आली. आरोग्य विभाग, अंगणवाडी सेविका आणि आशा कार्यकर्त्यांच्या समन्वित प्रयत्नांमुळे मेळघाटातील कुपोषणाचे प्रमाण कमी झाल्याबद्दल मंत्री तटकरे यांनी समाधान व्यक्त केले. मात्र, उर्वरित कुपोषित बालकांपर्यंत अधिक प्रभावीपणे पोहोचण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

बैठकीत अंगणवाडी केंद्रांच्या मूलभूत सुविधांबाबतही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. राज्यातील प्रत्येक अंगणवाडी केंद्राला स्वतंत्र वीजमीटर उपलब्ध करून देण्यात येणार असून, नियमित वीजपुरवठा सुनिश्चित करण्यासाठी विजेची बिले ग्रामपंचायतीमार्फत भरण्याच्या सूचना देण्यात आल्या. या संदर्भात गटविकास अधिकाऱ्यांनी आवश्यक कार्यवाही तातडीने करण्याचे निर्देशही मंत्री तटकरे यांनी दिले.

याशिवाय, मेळघाटातील सिझेरियन प्रसूतींच्या वाढत्या प्रमाणाबाबत त्यांनी गंभीर चिंता व्यक्त केली. गेल्या तीन वर्षांत सामान्य प्रसूतींच्या तुलनेत सिझेरियन प्रसूतींचे प्रमाण का वाढले, याचा सखोल अभ्यास करून वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्याचे आदेश त्यांनी आरोग्य विभागाला दिले. या माध्यमातून आरोग्य व्यवस्थेतील त्रुटी शोधून आवश्यक सुधारणा करण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मंत्री आदिती तटकरे यांच्या या दौऱ्यामुळे मेळघाटातील अंगणवाडी व्यवस्था अधिक सक्षम होण्यास, कुपोषण निर्मूलनाच्या प्रयत्नांना चालना मिळण्यास आणि ग्रामीण आरोग्य सेवांमध्ये सुधारणा होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button