नांदेडमध्ये शिक्षकासह दोन चिमुकल्यांचे मृतदेह कारमध्ये आढळले

गोदावरी नदीपात्रातील घटनेने खळबळ; व्हॉट्सअॅप स्टेटसमधील उल्लेखाची पोलिसांकडून पडताळणी सुरू
नांदेड | प्रतिनिधी
नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यात गोदावरी नदीपात्रात कारसह तीन मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मृतांमध्ये जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक सुनील मोरे आणि त्यांची दोन लहान मुले सारा व सुमित यांचा समावेश आहे. या घटनेमुळे शिक्षण विभागासह संपूर्ण जिल्ह्यात शोककळा पसरली असून, घटनेमागील नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांनी सखोल तपास सुरू केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुदखेड तालुक्यातील आमदुरा येथील गोदावरी नदीपात्रात एक कार असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी प्रशासनाला दिली. त्यानंतर पोलीस, महसूल प्रशासन आणि एसडीआरएफचे पथक घटनास्थळी दाखल झाले. बचाव पथकाने कार नदीबाहेर काढल्यानंतर त्यामध्ये तीन मृतदेह आढळून आले.
पोलिसांनी मृतांची ओळख हिमायतनगर तालुक्यातील पोटा बुद्रुक येथील जिल्हा परिषद शाळेत कार्यरत असलेले शिक्षक सुनील मोरे आणि त्यांची दोन मुले अशी केली आहे. सुनील मोरे हे मूळचे भोकर तालुक्यातील बेंबर गावचे रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, घटनेपूर्वी सुनील मोरे यांच्या व्हॉट्सअॅप स्टेटसमध्ये काही वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून होत असलेल्या कथित त्रासाचा उल्लेख असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मात्र, या स्टेटसमधील मजकूर, त्याची सत्यता आणि त्याचा या घटनेशी असलेला संबंध याची पडताळणी पोलीस करत असून, तपास पूर्ण होण्यापूर्वी याबाबत कोणताही निष्कर्ष काढण्यात आलेला नाही.
या घटनेनंतर शिक्षण विभागात तसेच शिक्षक संघटनांमध्ये हळहळ व्यक्त केली जात असून, संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी होत आहे.
पोलिसांनी या प्रकरणाचा विविध अंगांनी तपास सुरू केला असून, तांत्रिक पुरावे, घटनास्थळावरील माहिती आणि संबंधित व्यक्तींचे जबाब यांच्या आधारे मृत्यूमागील नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे. तपासानंतरच या प्रकरणाचे सर्व पैलू स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.



