स्वच्छतेच्या प्रश्नावर अमरावती मनपा आमसभेबाहेर कचरा आंदोलन

एमआयएमचे महाराष्ट्र महासचिव नाजिम माजी यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांचा संताप; सात दिवसांपासून कचरा उचलला जात नसल्याचा आरोप
अमरावती | प्रतिनिधी
अमरावती शहरातील स्वच्छता व्यवस्थेच्या प्रश्नावर नागरिकांचा संताप अखेर महानगरपालिकेच्या आमसभेपर्यंत पोहोचला. शहरातील अनेक भागांत सात दिवसांपासून कचरा उचलला जात नसल्याचा आरोप करत एमआयएमचे महाराष्ट्र महासचिव नाजिम माजी यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी महानगरपालिका मुख्यालयात जोरदार आंदोलन केले. आमसभा सुरू असतानाच आंदोलनकर्त्यांनी सभागृहाबाहेर कचरा टाकून प्रशासनाचा निषेध व्यक्त केला. या आंदोलनामुळे मनपा मुख्यालयात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.
आंदोलनकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, शहरातील अनेक प्रभागांमध्ये गेल्या सात दिवसांपासून कचरा संकलनाच्या गाड्या फिरत नसल्याने घरांमधील तसेच सार्वजनिक डस्टबिनमधील कचरा साचून राहिला आहे. त्यामुळे नागरिकांना दुर्गंधी, अस्वच्छता आणि आरोग्यविषयक समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचा आरोप करण्यात आला.
नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही स्वच्छता विभाग, संबंधित अधिकारी आणि ठेकेदार कंपनीकडून कोणतीही प्रभावी कार्यवाही करण्यात आली नसल्याचा आरोप आंदोलनादरम्यान करण्यात आला. तसेच स्वच्छता कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन मिळत नसल्यामुळे ते वारंवार संपावर जात असल्याने शहरातील साफसफाईची कामे विस्कळीत झाल्याचा दावाही आंदोलनकर्त्यांनी केला.
दरम्यान, शहरातील स्वच्छता व्यवस्थेची जबाबदारी असलेल्या कोनार्क कंपनीच्या कामकाजावरही आंदोलनकर्त्यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले. यापूर्वी महानगरपालिका सभागृहात कंपनीचे बिल रोखण्याचा ठराव करण्यात आला होता. मात्र, कंपनीवर करण्यात आलेली लाखो रुपयांची दंडात्मक कपात माफ करण्यात आल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.
संतप्त नागरिकांनी कचऱ्याने भरलेले डबे घेऊन मनपा मुख्यालय गाठत प्रशासनाशी तातडीने चर्चा करण्याची मागणी केली. मागण्या मान्य न झाल्यास कचरा थेट आमसभागृहात टाकण्याचा इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिला.
या आंदोलनानंतर आमसभेतही स्वच्छता व्यवस्थेचा मुद्दा चांगलाच गाजला. आंदोलनकर्ते आणि कचरा सभागृहाच्या प्रवेशद्वारापर्यंत कसा पोहोचला, याबाबत काही नगरसेवकांनी प्रश्न उपस्थित केले. या घटनेमुळे शहरातील स्वच्छता व्यवस्थेवरील वाद अधिक तीव्र झाला असून प्रशासन, संबंधित ठेकेदार आणि लोकप्रतिनिधी यांच्या जबाबदारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
दरम्यान, या आंदोलनानंतर महानगरपालिका प्रशासन स्वच्छता व्यवस्थेतील त्रुटी दूर करण्यासाठी कोणती पावले उचलते आणि शहरातील कचरा संकलनाची समस्या कधी मार्गी लागते, याकडे अमरावतीकरांचे लक्ष लागले आहे.



