AmravatiAmravatiMahanagarpalikaAmravatiMunicipalCorporationcitynewsLatest NewsMaharashtra

नाला सफाईवर लाखोंचा खर्च; तरीही अमरावतीत नाल्यांच्या कडेला कचऱ्याचे ढीग कायम

बेलपुरा ते राजापेठ, राजकमल चौकसह अनेक भागांतील स्थितीवर नागरिकांचा संताप; प्रभावी देखरेखीचा अभाव असल्याचा आरोप

अमरावती | प्रतिनिधी

अमरावती शहरात पावसाळ्याला सुरुवात झाली असतानाच महापालिकेच्या नाला सफाईच्या कामांवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. लाखो रुपयांचा खर्च करूनही शहरातील अनेक प्रमुख नाल्यांच्या कडेला काढलेला गाळ आणि कचऱ्याचे ढीग कायम असल्याचे चित्र समोर आले आहे. यामुळे मुसळधार पावसात नाले पुन्हा तुंबण्याची शक्यता व्यक्त होत असून नागरिकांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली आहे.

राजापेठ आणि राजकमल चौक परिसरातून अंबादेवी नाल्याकडे जाणारा शहरातील प्रमुख नाला सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, अनेक वर्षांपासून या नाल्याची प्रभावी साफसफाई झालेली नाही. नाल्यातून काढण्यात आलेला गाळ आणि कचरा त्वरित उचलण्याऐवजी तो नाल्याच्या कडेलाच टाकला जात असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

नागरिकांच्या मते, हीच परिस्थिती दरवर्षी निर्माण होते. पावसाळ्यात हा कचरा पुन्हा नाल्यात वाहून जातो, त्यामुळे नाले गाळाने भरतात आणि मुसळधार पावसात पाणी तुंबून ओव्हरफ्लो होण्याचा धोका वाढतो.

बेलपुरा, राजकमल चौक, फर्शी स्टॉप, केडिया नगर, भूतेश्वर नाला, खापर्डे बगीचा तसेच शहरातील इतर अनेक भागांमध्येही नाल्यांच्या कडेला कचऱ्याचे ढीग दिसून येत असल्याचा दावा स्थानिकांनी केला आहे.

नाला सफाईचे काम कंत्राटदारांकडे सोपविण्यात आले असले, तरी त्यावर प्रभावी देखरेख नसल्याने केवळ वरवरची साफसफाई होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. लाखो रुपयांचा खर्च होत असतानाही प्रत्यक्षात अपेक्षित परिणाम दिसून येत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

महापालिका आयुक्त आणि संबंधित अधिकाऱ्यांनी विविध भागांची पाहणी केली असली, तरी प्रत्यक्ष जमिनीवरील परिस्थितीत अपेक्षित सुधारणा झालेली नसल्याचा आरोपही नागरिकांकडून करण्यात येत आहे.

दरम्यान, नाल्यातून काढलेला गाळ व कचरा तातडीने उचलून त्याची शास्त्रोक्त विल्हेवाट लावल्यास नाले मोकळे राहतील, पावसाळ्यातील पाणी साचण्याच्या समस्येतही मोठ्या प्रमाणात घट होईल, असे मत स्थानिक नागरिकांनी व्यक्त केले आहे.

आता नाला सफाईच्या कामांबाबत करण्यात आलेल्या आरोपांची प्रशासन कशाप्रकारे दखल घेते आणि शहरातील नाल्यांची प्रभावी साफसफाई कधी पूर्ण होते, याकडे अमरावतीकरांचे लक्ष लागले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button