आसगाव-चौरास ग्रामपंचायतीतील विकासकामांवर प्रश्नचिन्ह

माहिती अधिकारातून समोर आलेल्या कागदपत्रांमुळे निधी वापराबाबत ग्रामस्थांच्या शंका; चौकशीची मागणी तीव्र
पवनी (भंडारा) | प्रतिनिधी
भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील आसगाव-चौरास ग्रामपंचायतीतील विविध विकासकामांच्या अंमलबजावणीबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. माहिती अधिकारातून प्राप्त झालेल्या कागदपत्रांच्या आधारे ग्रामपंचायतीच्या कारभाराबाबत शंका व्यक्त करण्यात येत असून, विकासकामांसाठी मंजूर झालेल्या निधीच्या वापराबाबत सखोल चौकशी करण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
माहिती अधिकार कार्यकर्ते दिनेश सावरबांधे यांनी मिळविलेल्या कागदपत्रांनुसार, ग्रामपंचायत क्षेत्रातील वाचनालय, स्मशानभूमी, अंगणवाडी, पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन तसेच इतर विविध विकासकामांसाठी शासनाकडून मोठ्या प्रमाणात निधी मंजूर करण्यात आला होता. मात्र, काही कामे प्रत्यक्षात अपूर्ण असल्याचा किंवा अपेक्षित स्वरूपात दिसून न आल्याचा दावा ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, काही विकासकामांच्या गुणवत्तेबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत. काही ठिकाणी कामे अपूर्ण असल्याचे सांगितले जात असून, तर काही कामांचे प्रत्यक्ष अस्तित्व किंवा पूर्णत्वाबाबत नागरिकांनी शंका व्यक्त केली आहे. त्यामुळे शासनाने मंजूर केलेल्या निधीचा वापर नेमका कसा झाला, याबाबत पारदर्शक माहिती जनतेसमोर यावी, अशी मागणी पुढे येत आहे.
या प्रकरणात प्रभारी सरपंच महेश आनंदराव फुंडे तसेच संबंधित ग्रामसेवक यांच्या भूमिकेबाबतही प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. तथापि, या संदर्भातील आरोपांची अधिकृत चौकशी अद्याप पूर्ण झालेली नसून संबंधित पक्षांची भूमिका समोर येणे बाकी आहे.
गावात विकासकामांचे दावे मोठ्या प्रमाणात करण्यात येत असताना प्रत्यक्षात त्याचे परिणाम अपेक्षित स्वरूपात दिसून येत नसल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. त्यामुळे “मंजूर झालेला निधी नेमका कुठे आणि कसा खर्च झाला?” हा प्रश्न ग्रामस्थांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे.
दरम्यान, संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष आणि सखोल चौकशी करण्यात यावी, तसेच दोषी आढळणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी प्रशासनाकडे केली आहे. चौकशीस विलंब झाल्यास ग्रामपंचायत कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही काही ग्रामस्थांनी दिला आहे.
या प्रकरणामुळे परिसरात विविध चर्चांना उधाण आले असून आता जिल्हा प्रशासन, पंचायत विभाग आणि संबंधित यंत्रणा या आरोपांची कितपत दखल घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. चौकशीनंतरच या आरोपांमागील वस्तुस्थिती स्पष्ट होणार असून ग्रामस्थांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.



