AmravatiAmravatiMahanagarpalikaAmravatiMunicipalCorporationcitynewsLatest NewsMaharashtra

तीन महिन्यांपासून वेतन नाही; बडनेऱ्यात ६० सफाई कर्मचाऱ्यांचा झाडू खाली ठेवत कामबंद आंदोलन

अमरावती : अमरावती महानगरपालिकेच्या स्वच्छता व्यवस्थेला आज मोठा धक्का बसला असून बडनेरा झोन क्रमांक ४ मधील तब्बल ६० सफाई कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन सुरू केले आहे. गेल्या तीन महिन्यांपासून नियमित आणि पूर्ण वेतन मिळत नसल्याचा आरोप करत कर्मचाऱ्यांनी कोणार्क इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यामुळे परिसरातील स्वच्छता व्यवस्थेवर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

माहितीनुसार, अमरावती महानगरपालिकेच्या स्वच्छता सेवेचे कंत्राट कोणार्क इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड या कंपनीकडे आहे. मात्र या कंपनीमार्फत कार्यरत असलेल्या सफाई कर्मचाऱ्यांनी वेतनासह विविध मागण्यांसाठी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे.

आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांचा आरोप आहे की, गेल्या तीन महिन्यांपासून त्यांना नियमित वेतन मिळत नाही. अनेकांच्या पगारातून कपात केली जात आहे, मात्र कपातीचे कारण स्पष्ट केले जात नसल्याने कामगारांमध्ये तीव्र नाराजी आहे. तसेच वेतनाची पे स्लिप दिली जात नसल्याने कामगारांना आपल्या पगाराची अचूक माहितीही मिळत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या आंदोलनात सात महिला सफाई कर्मचाऱ्यांचाही सहभाग असून महिला कर्मचाऱ्यांना मानसिक त्रास दिला जात असल्याचा गंभीर आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. याशिवाय करारातील अटींनुसार ५८ वर्षांवरील कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करू नये, प्रलंबित वेतन तातडीने अदा करावे आणि सर्व कामगारांना न्याय द्यावा, अशा विविध मागण्या आंदोलनकर्त्यांनी मांडल्या आहेत.

आंदोलनस्थळी “हमरी मांगे पुरी करो”च्या घोषणांनी परिसर दणाणून गेला. संतप्त कर्मचाऱ्यांनी जोपर्यंत त्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा दिला आहे.

दरम्यान, कामबंद आंदोलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई होऊ शकते, अशी ऑफ कॅमेरा चर्चा काही आरोग्य निरीक्षकांकडून करण्यात आल्याचा दावा आंदोलनकर्त्यांनी केला आहे. त्यामुळे आधीच असंतुष्ट असलेल्या कामगारांमध्ये आणखी संताप वाढला आहे.

सामाजिक कार्यकर्ते शैलेश मेघवानी यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन कामगारांच्या मागण्यांना पाठिंबा दिला. शहर स्वच्छ ठेवणाऱ्या कर्मचाऱ्यांनाच आपल्या हक्कांसाठी आणि वेतनासाठी रस्त्यावर उतरावे लागत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. तसेच संबंधित अधिकाऱ्यांनी या प्रश्नावर तातडीने तोडगा काढावा, अशी मागणीही त्यांनी केली.

एकीकडे शहर स्वच्छतेचे मोठे दावे केले जात असताना दुसरीकडे स्वच्छता व्यवस्थेचा कणा मानल्या जाणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांनाच वेतनासाठी संघर्ष करावा लागत असल्याचे चित्र बडनेऱ्यात पाहायला मिळत आहे. आता प्रशासन आणि कंत्राटदार कंपनी या गंभीर प्रश्नावर कोणती भूमिका घेते आणि आंदोलनाचा पुढील मार्ग काय असणार, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button