agriculturecitynewsLatest NewsMaharashtraMaharashtra PoliticsNandurbarpolitics

नंदुरबारमध्ये इंधनाचा पुरेसा साठा; शेतकरी व नागरिकांना कमतरता भासू देऊ नका – पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबार : जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असून कोणत्याही परिस्थितीत शेतकरी, नागरिक तसेच अत्यावश्यक सेवांना इंधनाची कमतरता भासू नये, यासाठी पुरवठा व्यवस्था सुरळीत ठेवण्याचे निर्देश राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री तथा नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या आढावा बैठकीत जिल्ह्यातील इंधन साठा, पुरवठा व्यवस्था आणि वितरणाची सद्यस्थिती यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी आमदार राजेश पाडवी, आमदार आमश्या पाडवी, जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल, जिल्हा पोलीस अधीक्षक अश्विनी सानप, निवासी उपजिल्हाधिकारी आशा संघवी, जिल्हा पुरवठा अधिकारी कैलास पवार तसेच विविध तेल कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

बैठकीत सादर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, नंदुरबार जिल्ह्यात सध्या एकूण ९१ पेट्रोल पंप कार्यरत आहेत. यामध्ये हिंदुस्तान पेट्रोलियम (एचपीसीएल) चे २९, भारत पेट्रोलियम (बीपीसीएल) चे ३१ आणि इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (आयओसीएल) चे ३१ पेट्रोल पंपांचा समावेश आहे. जिल्ह्यात दररोज सरासरी २८६.३५ किलोलीटर इंधनाची विक्री होत असून सध्या ६४०.७५ किलोलीटर इतका पेट्रोल आणि डिझेलचा साठा उपलब्ध आहे.

यामध्ये एचपीसीएलकडे १५८.७२ किलोलीटर, बीपीसीएलकडे २२१.७३ किलोलीटर तर आयओसीएलकडे २६०.३० किलोलीटर इंधन साठा उपलब्ध असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. उपलब्ध साठा जिल्ह्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी पुरेसा असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.

पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी इंधन कंपन्यांच्या अधिकाऱ्यांना पुरवठा साखळीवर सतत लक्ष ठेवण्याचे निर्देश दिले. कोणत्याही कारणामुळे पेट्रोल किंवा डिझेलचा तुटवडा निर्माण होऊ नये, यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्यास सांगितले. तसेच पेट्रोल पंप चालकांशी सातत्याने समन्वय ठेवून परिस्थितीचा नियमित आढावा घेण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

यावेळी पालकमंत्री मुश्रीफ यांनी नागरिकांना आवाहन करताना सांगितले की, जिल्ह्यात इंधनाचा कोणताही तुटवडा नाही. त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवून घाबरून जाऊन अनावश्यक इंधन खरेदी करू नये. प्रशासन आणि संबंधित विभागांकडून वेळोवेळी देण्यात येणाऱ्या अधिकृत माहितीलाच नागरिकांनी प्राधान्य द्यावे.

तसेच इंधन पुरवठ्याबाबत कोणतीही अडचण अथवा तक्रार असल्यास संबंधित तेल कंपन्यांच्या विक्री अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याची माहितीही बैठकीत देण्यात आली.

दरम्यान, खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना इंधनाची आवश्यकता मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे शेतीकामे, वाहतूक व्यवस्था आणि अत्यावश्यक सेवांवर कोणताही परिणाम होणार नाही, यासाठी प्रशासनाने विशेष दक्षता घेतल्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी स्पष्ट केले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button