बहिणीच्या सन्मानासाठी गेला जीव; छेडछाडीचा जाब विचारणाऱ्या तरुणाची भररस्त्यात निर्घृण हत्या, अमरावती हादरली

अमरावती : शहरात पुन्हा एकदा रक्तरंजित हत्याकांडाने खळबळ उडाली आहे. बहिणीची छेडछाड करणाऱ्यांना जाब विचारणे एका तरुणाच्या जीवावर बेतले. भर रस्त्यात धारदार शस्त्राने सपासप वार करत 26 वर्षीय प्रज्वल खरे याची निर्घृण हत्या करण्यात आली. या थरारक घटनेमुळे संपूर्ण शहर हादरले असून नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जय सियाराम नगर परिसरात गुरुवारी रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, विलासनगर येथील 26 वर्षीय प्रज्वल सुनील खरे हा आपल्या घरी असताना त्याच्या बहिणीने त्याला फोन करून मदतीसाठी बोलावले. जय सियाराम नगरमधील गजानन महाराज मंदिराजवळ काही युवकांनी तिची आणि तिच्या मैत्रिणीची छेड काढल्याचा आरोप आहे.
बहिणीच्या सन्मानासाठी प्रज्वल तात्काळ मित्र अक्षय पावडे याला सोबत घेऊन घटनास्थळी पोहोचला. यावेळी छेडछाड करणाऱ्या युवकांना जाब विचारताच दोन्ही गटांमध्ये जोरदार वाद सुरू झाला. क्षणातच हा वाद हाणामारीत बदलला.
आरोपींपैकी एकाने कमरेतून धारदार शस्त्र काढत प्रज्वलवर जीवघेणा हल्ला चढवला. पोटावर आणि शरीराच्या विविध भागांवर सपासप वार करण्यात आल्याने प्रज्वल गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात कोसळला.
मित्राला वाचवण्यासाठी धावलेल्या अक्षय पावडेवरही हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र जीव वाचवण्यासाठी त्याने तेथून पळ काढला. दरम्यान, हल्लेखोरांनी अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून पलायन केले.
घटनेची माहिती मिळताच प्रज्वलच्या मित्रांनी त्याला तातडीने डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यासाठी नेले. मात्र अतिरक्तस्रावामुळे रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. डॉक्टरांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले.
घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्त राकेश ओला, पोलीस उपायुक्त श्याम घुगे, क्राईम ब्रँचचे पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण आणि गाडगेनगरचे पोलीस निरीक्षक गोरखनाथ जाधव यांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला.
क्राईम ब्रँचने रात्रीच विशेष शोधमोहीम राबवत दोन संशयितांना ताब्यात घेतले असून मुख्य आरोपींचा शोध सुरू आहे.
या घटनेमुळे शहरातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. भरवस्तीत छेडछाड आणि त्यानंतर झालेल्या हत्येमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
बहिणीच्या सन्मानासाठी उभा ठाकलेला भाऊ आता कायमचा काळाच्या पडद्याआड गेला आहे. छेडछाडीच्या किरकोळ वादातून झालेल्या या निर्घृण हत्येमुळे अमरावती शहर पुन्हा एकदा हादरले असून या प्रकरणातील सर्व आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. सध्या या प्रकरणाचा तपास गाडगेनगर पोलीस आणि क्राईम ब्रँचकडून सुरू आहे.



