यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षा २७ मेपासून; एआय-आधारित सीसीटीव्ही देखरेखीखाली परीक्षा प्रक्रिया

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिकच्या उन्हाळी मे-जून २०२६ परीक्षांना २७ मेपासून प्रारंभ होत असून अमरावती विभागांतर्गत एकूण ८४ परीक्षा केंद्रांची निश्चिती करण्यात आली आहे. परीक्षा शिस्तबद्ध, पारदर्शक आणि कॉपीमुक्त वातावरणात पार पडाव्यात यासाठी विद्यापीठ प्रशासनाकडून यंदा अनेक कठोर आणि महत्त्वपूर्ण उपाययोजना राबविण्यात आल्या आहेत.
कुलगुरू डॉ. राजीव सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली, प्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंग बिसेन, परीक्षा नियंत्रक बटूप्रसाद पाटील तसेच विभागीय संचालक डॉ. जयंत वडते यांच्या सहकार्याने परीक्षा व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यावर भर देण्यात आला आहे.
यंदाच्या परीक्षेचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे सर्व परीक्षा केंद्रांवर प्रथमच एआय-आधारित सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या यंत्रणेचे नियंत्रण परीक्षा विभाग, नाशिक तसेच विभागीय केंद्रामार्फत करण्यात येणार आहे. प्रश्नपत्रिका डाउनलोड करण्यापासून ते उत्तरपत्रिका सीलिंगपर्यंतची संपूर्ण प्रक्रिया सीसीटीव्ही देखरेखीखाली राहणार असल्याने परीक्षा प्रक्रियेत अधिक पारदर्शकता येणार आहे.
विद्यापीठाचा हा निर्णय सर्व स्तरांतून स्वागतार्ह मानला जात असून परीक्षा व्यवस्थापनात तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्याचा हा महत्त्वाचा प्रयत्न मानला जात आहे.
मागील जानेवारी २०२६ हिवाळी परीक्षेदरम्यान काही संवेदनशील केंद्रांवर अमरावती विभागीय केंद्रामार्फत ‘बैठे भरारी पथक’ ही संकल्पना राबविण्यात आली होती. या उपक्रमाबाबत विद्यार्थी आणि पालकांनी समाधान व्यक्त केले होते. दरम्यान, मे-जून २०२६ परीक्षेसाठी भरारी पथकांमध्ये प्राचार्य दर्जाच्या अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला असून वरिष्ठ बहिस्थ पर्यवेक्षक म्हणून नीट सेट आणि पीएचडी पात्रता धारकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
तसेच सर्व पर्यवेक्षक आणि पथक सदस्यांच्या स्वतंत्र बैठका घेऊन त्यांच्या जबाबदाऱ्या आणि कर्तव्यांविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात येत आहे. वरिष्ठ बहिस्थ पर्यवेक्षक आणि भरारी पथक सदस्यांच्या नियुक्त्यांना विद्यापीठाची पूर्वमान्यता घेण्यात आली असून परीक्षा आयोजनाची सर्व तयारी पूर्ण झाल्याची माहिती अमरावती विभागाचे वरिष्ठ शैक्षणिक सल्लागार यांनी दिली आहे.
विद्यापीठ प्रशासनाने यंदाच्या उन्हाळी परीक्षा नियमबद्ध, पारदर्शक, शिस्तबद्ध आणि विद्यार्थीकेंद्रित तणावमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी सर्व संबंधितांनी सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे.
यंदाच्या परीक्षा प्रक्रियेत तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून पारदर्शकता आणि विश्वासार्हता वाढवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. एआय-आधारित सीसीटीव्ही यंत्रणेमुळे परीक्षा प्रक्रियेवर अधिक प्रभावी नियंत्रण ठेवता येणार असून कोणतीही अनियमितता रोखण्यासाठी ही प्रणाली महत्त्वाची ठरणार असल्याचा विश्वास विद्यापीठ प्रशासनाने व्यक्त केला आहे.



