राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमातून शेकडो बालकांना नवजीवन; जिल्ह्यात ८७९ हृदय शस्त्रक्रिया यशस्वी

राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम हा जिल्ह्यातील हजारो बालकांसाठी आशेचा किरण ठरला आहे. या महत्त्वाकांक्षी उपक्रमाच्या माध्यमातून गंभीर आजारांनी ग्रस्त असलेल्या बालकांना नवजीवन मिळाले असून अनेक कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला आहे.
मागील काही वर्षांत जिल्ह्यात तब्बल ८७९ हृदय शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आल्या आहेत. याशिवाय ४ हजार ५४७ इतर शस्त्रक्रियाही करण्यात आल्या असून विशेष म्हणजे या सर्व उपचारांसाठी बालकांच्या पालकांना एक रुपयाही खर्च करावा लागलेला नाही.
आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या मार्गदर्शनाखाली या योजनेची प्रभावी अंमलबजावणी केली जात आहे. अंगणवाडीपासून ते शाळा स्तरापर्यंत प्रत्येक बालकाचे आरोग्य तपासणीद्वारे स्क्रीनिंग करण्यात आले आहे.
दुर्गम भागांमध्येही आरोग्य सेवा पोहोचवून आजारांचे वेळेत निदान करणे ही या योजनेची मोठी ताकद ठरली आहे. त्यामुळे अनेक बालकांना गंभीर आजारांपासून वेळेत उपचार मिळू शकले आहेत.
या योजनेअंतर्गत जन्मजात हृदय रोग, जन्मजात नेत्र रोग, जन्मजात कर्णदोष, दुभंगलेले ओठ व टाळू, हर्निया व हायड्रोसील, डोळ्यांचा तिरळेपणा, दंतरोग, फायमोसीस, हाडांचे विविध आजार आणि टॉन्सिल्स यांसारख्या आजारांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत.
या मोहिमेमध्ये अनेक नामवंत रुग्णालयांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. अमरावती येथील विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय, डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय, डॉ. पाटील कान-नाक-घसा हॉस्पिटल, आचार्य विनोबा भावे रुग्णालय सावंगी, तसेच मुंबई आणि नागपूरमधील विविध सुपर स्पेशालिटी रुग्णालयांनी या शस्त्रक्रिया पार पाडल्या आहेत.
जिल्हा पातळीवर कार्यरत असलेल्या विशेष पथकांमार्फत तालुकास्तरावर बालकांना मोफत आरोग्य सेवा पुरविली जात आहे. जिल्ह्यातील बालकांना कोणताही दुर्धर आजार असल्यास या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विनोद पवार यांनी केले आहे.
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांतील अनेक बालकांना वेळेत उपचार मिळून नवजीवन मिळत असल्याचे चित्र सध्या जिल्ह्यात पाहायला मिळत आहे.



