अड्याळ येथील ‘महाराजस्व अभियान’ ठरले फसवे? रिकाम्या खुर्च्या आणि अधिकाऱ्यांच्या टोलवाटोलवीमुळे महसूल विभागावर प्रश्नचिन्ह

भंडारा : जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील अड्याळ येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘महाराजस्व अभियान’ कार्यक्रमावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. जनतेच्या समस्या गावपातळीवर सोडवण्यासाठी आणि विविध शासकीय सेवा नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला नागरिकांनीच पाठ फिरवल्याचे चित्र समोर आले.
अड्याळ येथील गणेश सभागृहात झालेल्या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात खुर्च्या रिकाम्या दिसून आल्या. स्थानिक पातळीवर पुरेशी जनजागृती न झाल्याने अनेक नागरिकांना या कार्यक्रमाची माहितीच मिळाली नसल्याची चर्चा आहे.
माहिती देण्यास अधिकाऱ्यांची टोलवाटोलवी?
कार्यक्रमाची माहिती घेण्यासाठी गेलेल्या माध्यम प्रतिनिधींना महसूल विभागाकडून समाधानकारक माहिती मिळाली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. तलाठ्यांनी माहिती मंडळ अधिकारी शेंडे यांच्याकडून घ्यावी असे सांगितले. मात्र वारंवार संपर्क साधूनही त्यांनी फोन न उचलल्याचे सांगण्यात आले.
त्यानंतर तहसीलदार आणि नायब तहसीलदार यांनीही पुन्हा मंडळ अधिकारी शेंडे यांच्याशी संपर्क साधण्यास सांगितल्याने अधिकाऱ्यांमधील समन्वयाचा अभाव स्पष्ट झाल्याची चर्चा आहे.
“माझा फोन शासकीय नाही…”
दरम्यान, प्रत्यक्ष भेटीनंतर मंडळ अधिकारी शेंडे यांनी “माझा फोन शासकीय नाही. कोणत्या नियमात फोन उचलावा असे लिहिले आहे?” असे वक्तव्य केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या कथित वक्तव्यामुळे प्रशासनातील जबाबदारीबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.
जनतेच्या पैशातून कार्यक्रम, पण जनतेचीच अनुपस्थिती
जनतेच्या करातून आयोजित करण्यात आलेल्या या अभियानात नागरिकांची कमी उपस्थिती आणि माहिती देताना अधिकाऱ्यांची कथित बेजबाबदार भूमिका यामुळे महसूल विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
या प्रकरणाची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घेऊन वस्तुस्थिती स्पष्ट करावी आणि संबंधित जबाबदारांवर आवश्यक ती कारवाई करावी, अशी मागणी आता स्थानिक स्तरावरून होत आहे.



