citynewsLatest NewsMaharashtra

मान्सूनपूर्व तयारीबाबत पालकमंत्री नितेश राणे यांचे प्रशासनाला निर्देश; आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सतर्क राहण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी, दि. १५ : आगामी मान्सून हंगाम, संभाव्य अतिवृष्टी, चक्रीवादळे आणि ‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने अधिक सतर्क राहून आपत्ती व्यवस्थापनाची प्रभावी तयारी करावी, असे निर्देश पालकमंत्री नितेश राणे यांनी दिले. जिल्हास्तरीय मान्सूनपूर्व तयारी आढावा बैठकीत ते बोलत होते.

बैठकीस जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजश्री सामंत तसेच विविध विभागांचे अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

दरडप्रवण भागांवर विशेष लक्ष

घाटमाथा परिसरात दरडी कोसळण्याचे प्रमाण जास्त असल्याने त्या ठिकाणी विशेष उपाययोजना राबविण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. घाट रस्त्यांवर सुरक्षेसाठी संरक्षक जाळ्या उभाराव्यात तसेच पावसाळ्यात धोका निर्माण करणारी झाडे पूर्वतयारी म्हणून हटवावीत, असे त्यांनी सांगितले.

पूरप्रवण गावांमध्ये वाढीव दक्षता

पूरस्थितीचा धोका लक्षात घेऊन पूरप्रवण गावांमध्ये अधिक दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले. बचावकार्य जलद आणि प्रभावी करण्यासाठी बोटींची संख्या वाढविणे, तसेच प्रशासनाच्या तयारीची चाचणी घेण्यासाठी मॉक ड्रिल आयोजित करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.

आरोग्य आणि वीज विभागाला सज्ज राहण्याचे आदेश

पावसाळ्यात साथीच्या आजारांचा धोका वाढत असल्याने आरोग्य विभागाने औषधसाठा, वैद्यकीय पथके आणि उपचार सुविधा तत्पर ठेवाव्यात, असे पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले.

महावितरण विभागाने वादळी पावसाच्या काळात वीजपुरवठा खंडित होणार नाही यासाठी आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात आणि नागरिकांना कोणतीही गैरसोय होऊ नये, याची दक्षता घ्यावी, असेही निर्देश देण्यात आले.

पर्यटनस्थळांवर विशेष जनजागृती

आंबोलीसह जिल्ह्यातील पर्यटनस्थळांवर मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असल्याने त्यांच्यासाठी विशेष जनजागृती मोहीम राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या. धोकादायक ठिकाणी पर्यटक जाणार नाहीत यासाठी स्थानिक प्रशासन, पोलीस आणि पर्यटन विभागाने समन्वयाने काम करावे, असे पालकमंत्र्यांनी सांगितले.

नद्यांतील गाळ काढण्यास गती

पूरस्थिती टाळण्यासाठी जिल्ह्यातील नद्यांमधील गाळ काढण्याच्या कामांना गती देण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले.

बैठकीच्या शेवटी पालकमंत्री नितेश राणे यांनी मान्सून काळात कोणतीही जीवित किंवा वित्तहानी होऊ नये यासाठी सर्व विभागांनी जबाबदारीने, समन्वयाने आणि सतर्कतेने काम करावे, असे आवाहन केले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button