Chhatrapati Sambhaji NagarcitynewsLatest NewsMaharashtra

खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना वेळेवर बियाणे, खते आणि कर्ज द्या; पालकमंत्री संजय शिरसाट यांचे निर्देश

छत्रपती संभाजीनगर, दि. १६ : खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना वेळेवर बियाणे, खते आणि पीक कर्ज उपलब्ध करून देण्यात यावे, जेणेकरून हंगामातील शेतीची कामे सुरळीत पार पडतील, असे निर्देश राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी दिले. तसेच कर्जमाफीला पात्र शेतकऱ्यांना नव्याने पीक कर्ज मिळण्याबाबत असलेला संभ्रम दूर करण्यासाठी हा विषय मंत्रिमंडळाच्या आगामी बैठकीत मांडण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

जिल्हा नियोजन सभागृहात आयोजित खरीप हंगामपूर्व नियोजन बैठकीत पालकमंत्री शिरसाट बोलत होते. या बैठकीस मंत्री अतुल सावे, खासदार डॉ. कल्याण काळे, आमदार अंबादास दानवे, प्रशांत बंब, विलास भुमरे यांच्यासह जिल्हाधिकारी विनय गौडा, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू पी.एम., पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड आणि विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

बँकांकडून अपुरे कर्जवाटप, खतांच्या लिंकिंगचा मुद्दा चर्चेत

बैठकीत आमदार प्रशांत बंब यांनी बँका उद्दिष्टानुसार पीक कर्ज वाटप करत नसल्याची तक्रार केली. तसेच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणाऱ्या विविध अनुदानांवर ‘होल्ड’ लावून ती रक्कम कर्ज खात्यात समायोजित केली जात असल्याचा मुद्दा उपस्थित केला. खतांचे ‘लिंकिंग’ थांबवावे आणि आवश्यकतेनुसार पुरेसे खत आवंटन करावे, अशी मागणी त्यांनी केली.

खासदार डॉ. कल्याण काळे यांनी शेतकऱ्यांना निर्धारित दरात खते मिळत आहेत का, याची वस्तुनिष्ठ तपासणी करण्याची मागणी केली. घरगुती साठवलेल्या सोयाबीन बियाण्यांची उगवणक्षमता तपासूनच शेतकऱ्यांना वापराचा सल्ला द्यावा, असे त्यांनी सांगितले.

जिल्ह्यात ६.९७ लाख हेक्टरवर पेरणीचे नियोजन

कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार, खरीप २०२६-२७ हंगामासाठी जिल्ह्यात ६ लाख ९७ हजार ८७ हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये कापूस ३.०८ लाख हेक्टर, मका २.६५ लाख हेक्टर, तूर ५४ हजार हेक्टर, सोयाबीन ३४ हजार हेक्टर आदी पिकांचा समावेश आहे.

बियाणे आणि खतांची मोठी मागणी

  • मका बियाणे – 39,845 क्विंटल
  • सोयाबीन बियाणे – 25,738 क्विंटल
  • कापूस बियाणे – 7,711 क्विंटल (17.13 लाख पाकिटे)

जिल्ह्यात खरीपासाठी रासायनिक खतांची एकूण मागणी 3.95 लाख मेट्रिक टन असून, मंजूर आवंटन 2.92 लाख मेट्रिक टन आहे. एप्रिलअखेर 1.23 लाख मेट्रिक टन खतसाठा उपलब्ध असल्याची माहिती देण्यात आली.

‘अल-निनो’चा संभाव्य परिणाम

बैठकीत प्रथमच ‘अल-निनो’च्या परिणामांवर सादरीकरण करण्यात आले. तापमानात १ ते २ अंशांनी वाढ होऊन पर्जन्यमानात घट आणि दुष्काळाची शक्यता निर्माण होऊ शकते, अशी माहिती कृषी विभागाने दिली.

पेरणीसाठी कृषी विद्यापीठाच्या शिफारसी

कृषी विद्यापीठाच्या शिफारसीनुसार १५ जून ते ७ जुलैदरम्यान पाऊस झाल्यास खरीप पिकांची पेरणी करणे योग्य राहील. उशिरा पाऊस झाल्यास त्यानुसार पर्यायी पिकांचे नियोजन करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

“मागणी दीडपट करा”

पालकमंत्री शिरसाट यांनी बियाणे आणि खतांची मागणी प्रत्यक्ष गरजेपेक्षा दीडपट ठेवण्याचे निर्देश दिले. शेजारील जिल्ह्यांतील शेतकरीही येथे खते खरेदी करत असल्याने त्याचा विचार करून नियोजन करण्यास सांगितले.

खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सर्व तयारी वेळेत पूर्ण करून शेतकऱ्यांना कोणत्याही अडचणीशिवाय आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button