Amaravti GraminAmravaticitynewsLatest NewsMaharashtra

सालोरा शिवारात भीषण आग; ४ ते ५ शेतांतील कचरा, पेंढे आणि वायरिंग जळून खाक

अमरावती जिल्ह्यातील सालोरा गावाजवळ दुपारी अचानक भीषण आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. गावापासून सुमारे ५०० मीटर अंतरावर लागलेल्या या आगीने काही क्षणांतच रौद्र रूप धारण केले. कडाक्याचे ऊन, ४५ अंश सेल्सिअस तापमान आणि वेगवान वाऱ्यामुळे आगीने झपाट्याने परिसर व्यापला.

या आगीत ४ ते ५ शेतांमध्ये साचलेला कचरा, पालापाचोळा, झाडाझुडपांचे ढिगारे आणि लाकडी इंधन पूर्णपणे जळून खाक झाले. आगीच्या ज्वाळा इतक्या वेगाने पसरल्या की जवळील एका घरावरील तुरीच्या पेंढ्यांपर्यंत पोहोचल्या. त्यामुळे काही काळासाठी घरालाही धोका निर्माण झाला होता.

मात्र, गावकऱ्यांनी प्रसंगावधान दाखवत तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पाणी आणि उपलब्ध साधनांच्या मदतीने त्यांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तिवसा नगरपंचायतीचे अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आणि शर्थीचे प्रयत्न करून आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवले. त्यांच्या तत्परतेमुळे आग गावाच्या वस्तीपर्यंत पोहोचण्यापूर्वीच विझवण्यात यश आले.

या घटनेत काही शेतकऱ्यांच्या कृषी पंपांच्या वायरिंगचे नुकसान झाले आहे. सुदैवाने बहुतांश शेतकऱ्यांनी आधीच पिकांची कापणी केली असल्याने मोठे आर्थिक नुकसान टळले.

स्थानिक नागरिकांच्या मते, प्रचंड उष्णता, कोरडे वातावरण किंवा रस्त्यावरून फेकलेल्या पेटत्या सिगारेट अथवा विडीमुळे आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे. मात्र आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

या भागात वारंवार आगीच्या घटना घडत असल्याने शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासनाने या घटनांची सखोल चौकशी करून प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button