वीस दिवसांपासून अंधारात विझोरा; संतप्त ग्रामस्थांचा महावितरणला आंदोलनाचा इशारा

जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील विझोरा गावात वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे ग्रामस्थांचा संताप उफाळून आला आहे. गेल्या वीस दिवसांपासून गावात वीजपुरवठा सुरळीत नसल्याने नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले असून, संतप्त ग्रामस्थांनी थेट महावितरणच्या धावडा कार्यालयात धडक देत तातडीने कारवाईची मागणी केली आहे.
वाढत्या उन्हाच्या पार्श्वभूमीवर गावात वीज नसल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. मोटारी बंद असल्याने पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम होत असून, शेतकऱ्यांची सिंचनाची कामेही खोळंबली आहेत. घरगुती कामांपासून ते शेतीपर्यंत सर्वच स्तरांवर नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
ग्रामस्थांनी सांगितले की, गेल्या अनेक दिवसांपासून वारंवार तक्रारी करूनही महावितरण प्रशासनाकडून कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही. त्यामुळे गावातील नागरिकांनी मोठ्या संख्येने स्वाक्षऱ्या करून निवेदन सादर केले आणि तात्काळ वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली.
युवा भाजपा कार्यकर्ते सचिन पाटील यांनी महावितरण अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवर संपर्क साधून तीव्र नाराजी व्यक्त केली. “गेल्या वीस दिवसांपासून आमचे गाव अंधारात आहे. प्रशासनाने त्वरित वीजपुरवठा पूर्ववत केला नाही, तर तीव्र आंदोलन छेडले जाईल,” असा इशारा त्यांनी दिला.
दरम्यान, ग्रामस्थांनीही स्पष्ट शब्दांत सांगितले की, समस्येची तातडीने दखल घेतली नाही तर आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल.
वीस दिवसांपासून अंधारात असलेल्या विझोरा गावातील नागरिकांचा संयम आता संपत चालला आहे. महावितरण प्रशासन या गंभीर समस्येवर किती लवकर तोडगा काढते, याकडे संपूर्ण गावाचे लक्ष लागले आहे.



