महिलांवरील लैंगिक अत्याचारांच्या घटनांमध्ये पुण्याचा देशात पाचवा क्रमांक; NCRB अहवालातील धक्कादायक आकडेवारी समोर

पुणे शहराबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. राष्ट्रीय गुन्हे नोंद विभाग अर्थात NCRB च्या २०२४ च्या अहवालानुसार महिलां आणि मुलींवरील लैंगिक अत्याचारांच्या घटनांमध्ये पुणे शहराचा देशात पाचवा क्रमांक लागला आहे. या अहवालामुळे पुण्यातील महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.
अहवालानुसार, पुणे शहरात महिलां आणि मुलींवरील लैंगिक अत्याचारांचे तब्बल २४४ गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. माहिती तंत्रज्ञान, शिक्षण आणि रोजगारासाठी देशभरात ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहराची ही आकडेवारी अत्यंत चिंताजनक मानली जात आहे.
गेल्या काही वर्षांत पुण्यात मोठ्या प्रमाणावर नागरीकरण आणि लोकसंख्या वाढ झाली आहे. शिक्षण, नोकरी आणि व्यवसायासाठी राज्यासह देशभरातून मोठ्या प्रमाणात युवक-युवती पुण्यात दाखल होत आहेत. मात्र त्याचबरोबर महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न अधिक गंभीर होत असल्याचं या आकडेवारीतून स्पष्ट होत आहे.
महिलांवरील अत्याचार, छेडछाड, लैंगिक शोषण आणि अल्पवयीन मुलींवरील गुन्ह्यांच्या वाढत्या घटनांमुळे सामाजिक संघटना आणि महिला हक्क संघटनांनी चिंता व्यक्त केली आहे. शहरात सुरक्षा यंत्रणा अधिक सक्षम करण्याची तसेच सार्वजनिक ठिकाणी पोलिसांची गस्त वाढवण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.
तज्ज्ञांच्या मते, महिलांविरोधातील गुन्ह्यांमध्ये वाढ होण्यामागे सोशल मीडिया गैरवापर, व्यसनाधीनता, वाढती असंवेदनशीलता आणि कायद्याची भीती कमी होणं ही काही प्रमुख कारणं मानली जात आहेत. याशिवाय अनेक प्रकरणांमध्ये पीडित महिलांना न्याय मिळण्यास होणारा विलंबही गंभीर मुद्दा ठरत आहे.
दरम्यान, पुणे पोलिसांकडून महिला सुरक्षेसाठी विविध उपक्रम राबवले जात असल्याचा दावा केला जात असला, तरी प्रत्यक्षात गुन्ह्यांची वाढती संख्या प्रशासनासमोर मोठं आव्हान उभं करत आहे.
महिला सुरक्षा हा केवळ कायदा आणि सुव्यवस्थेचा विषय नसून सामाजिक जबाबदारीचाही मुद्दा असल्याचं मत नागरिकांकडून व्यक्त होत आहे. महिलांना सुरक्षित वातावरण मिळण्यासाठी प्रशासन, पोलीस यंत्रणा आणि समाज यांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज असल्याचंही सांगितलं जात आहे.
NCRB च्या या अहवालामुळे पुण्यातील महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला असून, आता प्रशासन या गंभीर परिस्थितीकडे किती गांभीर्याने पाहतं, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.



