Latest NewsMaharashtraNagpur

Nagpur जिल्ह्यातील काटोल तालुक्यात भीषण स्फोट; १२ कामगारांचा मृत्यू

नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील राऊळगाव येथे आज सकाळी झालेल्या भीषण स्फोटात १२ कामगारांचा मृत्यू झाला असून १५ जण गंभीर जखमी झाले आहेत. स्फोट इतका प्रचंड होता की संपूर्ण परिसर हादरून गेला आणि नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

राऊळगाव येथील SBL कंपनीत रविवारी सकाळी साधारण सात वाजताच्या सुमारास हा भीषण स्फोट झाला. बारूद आणि डेटोनेटरसारखी स्फोटके तयार करणाऱ्या युनिटमध्ये अचानक झालेल्या स्फोटामुळे कंपनीचा मोठा भाग उद्ध्वस्त झाला. स्फोटानंतर परिसरात भीषण आग लागली.

जखमी कामगारांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून काहींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस, अग्निशमन दल आणि आपत्कालीन पथकांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले.

दरम्यान, मृतांच्या नातेवाईकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली असून वातावरण तणावपूर्ण झाले आहे. स्थानिक नागरिकांकडून कंपनीच्या सुरक्षाव्यवस्थेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. काटोलचे आमदार चरणसिंग ठाकूर यांनी कंपनीकडून सुरक्षेबाबत मोठे दुर्लक्ष झाल्याचा आरोप केला आहे. प्रशिक्षणा शिवाय कामगारांकडून काम करून घेतले जात असल्याचाही मुद्दा त्यांनी मांडला आहे.

स्फोटाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिसांकडून तपास सुरू आहे.

या भीषण दुर्घटनेमुळे नागपूर जिल्हा हादरला असून मृतांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सुरक्षा नियमांचे उल्लंघन झाले का आणि जबाबदारांवर कारवाई होणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button