मेळघाटातील शिवाझिरी घाटात पिकअप ५० फूट दरीत कोसळली; चार ठार, १५ हून अधिक जखमी

अमरावती जिल्ह्यातील धारणी तालुक्यातून अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मेळघाटातील शिवाझिरी घाटात भरधाव पिकअप वाहन तब्बल ५० फूट खोल दरीत कोसळल्याने चार जणांचा जागीच मृत्यू झाला असून १५ हून अधिक जण जखमी झाले आहेत. होळीच्या सणापूर्वीच या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मध्यप्रदेशातील देडतलाई येथील साप्ताहिक बाजारातून खरेदी करून परतणाऱ्या कंजोली आणि राणीगाव येथील ग्रामस्थांनी भरलेली पिकअप रविवारी रात्री सुमारे ८ वाजण्याच्या सुमारास शिवाझिरी घाट येथे चढाई करत होती. मात्र घाट चढताना अचानक चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि वाहन पुढे जाण्याऐवजी मागे सरकत थेट खोल दरीत कोसळले.
वाहनात तब्बल ३० ते ४० प्रवासी असल्याची प्राथमिक माहिती आहे. अपघातानंतर काही काळ मदतीसाठी आर्त हाका ऐकू येत होत्या. रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांना दरीत वाहनाची लाईट दिसताच त्यांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली. धारणी पोलीस ठाणे येथील पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत स्थानिकांच्या मदतीने बचावकार्य सुरू केले. जखमींना बाहेर काढून रुग्णवाहिकेद्वारे धारणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. सात जणांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना अमरावती येथे हलवण्यात आले आहे.
या अपघातात बाबूलाल दहीकर, सीताराम पटेल, किसान ताणू धांडे आणि सुकराई विश्राम धांडे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. दरम्यान, ही पिकअप केवळ चार दिवसांपूर्वीच विकण्यात आली होती आणि तिचा विमा करण्यात आला नव्हता, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे.
या भीषण अपघातामुळे होळीच्या सणापूर्वीच मेळघाटात शोककळा पसरली असून कंजोली परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी अपघाताचा गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.
या भीषण अपघातामुळे पुन्हा एकदा मेळघाटातील ओव्हरलोड वाहतूक आणि घाट रस्त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मृतांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून जखमींवर उपचार सुरू आहेत. घटनेचा पुढील तपास पोलिस करत आहेत.



