अमरावती महापालिकेची पहिली आमसभा पार; आठ स्वीकृत नगरसेवकांची घोषणा

विविध पक्षांकडून तज्ज्ञांना संधी; शहर विकासासाठी महत्त्वाचा टप्पा
अमरावती, दि. 20 फेब्रुवारी : अमरावती महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर महापौर व उपमहापौर निवड प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आज महापालिकेची पहिली आमसभा उत्साहात पार पडली. Dr. Babasaheb Ambedkar Sabhagruh येथे झालेल्या सभेत आठ स्वीकृत नगरसेवकांची अधिकृत घोषणा करण्यात आली.
महापौरांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेत विविध राजकीय पक्षांनी आपल्या कोट्यातून तज्ज्ञ आणि अनुभवी व्यक्तींना संधी देत स्वीकृत सदस्य म्हणून निवड जाहीर केली. शहराच्या विकासाच्या दृष्टीने ही निवड महत्त्वपूर्ण मानली जात आहे.
कोणाची झाली निवड?
सभेत जाहीर करण्यात आलेल्या स्वीकृत नगरसेवकांमध्ये —
- काँग्रेसकडून माजी महापौर मिलिंद चिमोटे आणि ‘दैनिक अमरावती मंडळ’ व ‘आपली मातृभूमी’चे संपादक अनिल अग्रवाल
- भारतीय जनता पक्षाकडून विधीतज्ञ प्रशांत देशपांडे आणि महाराष्ट्र केसरी म्हणून ओळख असलेले माजी नगरसेवक संजय तिरथकर
- शिवसेना (शिंदे गट) कडून दिनेश बुब
- युवा स्वाभिमान पक्षाकडून संजय हिंगासपुरे
- राष्ट्रवादी काँग्रेसकडून भोजराज काळे
- एआयएमआयएमकडून सैय्यद अली
यांची स्वीकृत नगरसेवक म्हणून नियुक्ती करण्यात आली. सभेदरम्यान सर्व सदस्यांचा सत्कार करण्यात आला व त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
स्वीकृत नगरसेवकांची भूमिका काय?
स्वीकृत नगरसेवक थेट जनतेतून निवडून येत नाहीत. महानगरपालिकेतील निवडून आलेल्या नगरसेवकांच्या मतदानाद्वारे, पक्षाच्या संख्याबळानुसार त्यांची निवड केली जाते. महाराष्ट्र महापालिका अधिनियमानुसार त्यांचा कार्यकाळ पाच वर्षांचा असतो.
सामाजिक, शैक्षणिक, विधी किंवा प्रशासकीय क्षेत्रातील अनुभव असलेल्या तज्ज्ञ व्यक्तींना पालिकेच्या कामकाजात सहभागी करून घेण्याचा उद्देश या प्रक्रियेचा असतो.
अधिकार आणि मर्यादा
स्वीकृत सदस्यांना महासभेत चर्चा करण्याचा, प्रश्न उपस्थित करण्याचा तसेच विविध स्थायी समित्यांवर काम करण्याचा अधिकार असतो. शहराच्या विकासात्मक कामांबाबत मत मांडण्याची संधी त्यांना मिळते. मात्र महापौर व उपमहापौर निवडणुकीत मतदानाचा अधिकार त्यांना नसतो.
राजकीय चर्चांना उधाण
राजकीय पक्षांना तज्ज्ञ व्यक्तींना संधी देण्याबरोबरच सभागृहातील संख्याबळ बळकट करण्यासाठी स्वीकृत नगरसेवक पदाचा वापर केला जातो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
दरम्यान, नव्या सदस्यांच्या निवडीमुळे महापालिकेच्या कामकाजाला वेग येईल आणि शहराच्या विकासात्मक प्रकल्पांना चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.



