AmravatiLatest News

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचा ‘आव्हान’ मध्ये विजयघोष! चमू व्यवस्थापकांचा कुलगुरूंच्या हस्ते गौरव

अमरावती – महामहीम राज्यपाल कार्यालयाच्या वतीने अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात आयोजित राज्यस्तरीय आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण शिबीर ‘आव्हान-२०२५’ मध्ये संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाने ‘उत्कृष्ट विद्यापीठ’ हा सर्वोच्च बहुमानाचा फिरता चषक पटकावून राज्याच्या शैक्षणिक नकाशावर आपला दबदबा निर्माण केला आहे. या ऐतिहासिक विजयाचे औचित्य साधून, मोहिमेचे नेतृत्व करणाऱ्या जिल्हा चमू व्यवस्थापकांचा गौरव सोहळा आज दि. ५ फेब्रुवारी २०२६ रोजी विद्यापीठाच्या डॉ. पंजाबराव देशमुख अधिसभा सभागृहात उत्साहात संपन्न झाला.

यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. निलेश कडू व सर्व चमू व्यवस्थापकांनी ‘आव्हान-२०२५’ चा विजेता फिरता चषक  कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांच्याकडे सन्मानपूर्वक सुपूर्द केला. या प्रसंगी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे, प्रभारी कुलसचिव डॉ. अजय लाड, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. राजीव बोरकर आणि अधिसभा सदस्य डॉ. प्रशांत विघे यांची प्रमुख उपस्थिती होती.

आव्हान शिबिरादरम्यान दाखवलेले उत्कृष्ट नियोजन आणि मार्गदर्शनाबद्दल जी. एस. कॉलेज, खामगाव येथील डॉ. नीता बोचे यांचा ‘उत्कृष्ट महिला चमू व्यवस्थापक’ फिरता चषक पटकावल्याबद्दल  कुलगुरू डॉ.मिलींद बारहाते यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. त्यांच्या नेतृत्वाखाली स्वयंसेवकांनी शिबिरात सर्वोत्तम कामगिरी नोंदवल्याबद्दल मान्यवरांनी त्यांचे कौतुक केले.

महाराष्ट्रातील २४ विद्यापीठांमधील ११२२ विद्यार्थ्यांच्या सहभागात अमरावती विद्यापीठाच्या १२५ स्वयंसेवकांनी आपले वेगळेपण सिद्ध केले. कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांनी आपल्या भाषणातून नमूद केले की, आपत्ती व्यवस्थापनातील जिद्द आणि शिस्त ही केवळ पुरस्कारापुरती मर्यादित नसून, ती समाजाप्रती असलेल्या उत्तरदायित्वाचा सन्मान आहे. विद्यार्थ्यांची शिस्तबद्धता, उत्कृष्ट देखावा आणि कार्यतत्परता यामुळेच विद्यापीठाला ‘आव्हान चान्सलर्स ब्रिगेड’ मध्ये हे यश संपादन करता आले.

पाचही जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांचे योगदान – रासेयो संचालक डॉ. निलेश कडू यांनी या यशाचे श्रेय पाचही जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांच्या कठोर परिश्रमाला आणि चमू व्यवस्थापकांच्या चोख नियोजनाला दिले. विद्यार्थ्यांनी मिरवणुकीत सादर केलेला उत्कृष्ट देखावा आणि प्रशिक्षणातील अनुकरणशीलता ही जमेची बाजू ठरल्याचे त्यांनी नमूद केले. या यशामुळे अमरावती विद्यापीठाची मान संपूर्ण राज्यात उंचावली असल्याचे त्यांनी सांगितले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button