मुंबई लोकलमधील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह; मालाड स्थानकात चाकूहल्ल्यात कॉलेज प्राध्यापकाची हत्या

मुंबई लोकलमधील प्रवाशांच्या सुरक्षेबाबतची गंभीर त्रुटी पुन्हा एकदा उघड झाली आहे. पश्चिम रेल्वे मार्गावरील मालाड रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर लोकलमधून उतरताना झालेल्या किरकोळ वादातून एका प्रवाशाने धारदार शस्त्राने हल्ला करत दुसऱ्या प्रवाशाची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात आलोक सिंह (वय अंदाजे 40) यांचा मृत्यू झाला आहे.
प्राथमिक माहितीनुसार, आलोक सिंह हे नरसी मोंजी कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्समध्ये गणित आणि सांख्यिकीचे प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. शनिवारी सायंकाळी ते विलेपार्ले येथून बोरिवलीच्या दिशेने जाणाऱ्या धीम्या लोकलने प्रवास करत होते. सायंकाळी सुमारे 6.30 वाजता लोकल मालाड स्थानकात पोहोचली असता, उतरताना दरवाज्यात उभ्या असलेल्या एका व्यक्तीसोबत त्यांचा वाद झाला.
हा वाद क्षणार्धात हिंसक वळणावर गेला. गर्दीचा फायदा घेत आरोपीने आलोक सिंह यांच्या पोटात धारदार चाकूने वार केला आणि घटनास्थळावरून फरार झाला. गंभीर जखमी अवस्थेत आलोक सिंह यांना तात्काळ शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
घटनेनंतर रेल्वे पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे. मालाड तसेच मागील रेल्वे स्थानकांवरील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध घेतला जात आहे. दरम्यान, लोकल ट्रेनमध्ये धारदार शस्त्र घेऊन प्रवास कसा शक्य होतो, असा सवाल उपस्थित होत असून रेल्वे सुरक्षेवर तीव्र टीका केली जात आहे.
या घटनेची माहिती पोलिसांनी आलोक सिंह यांच्या कुटुंबीयांना आणि महाविद्यालय प्रशासनाला दिली आहे. भरगच्च लोकल, अपुरी तपासणी व्यवस्था आणि सुरक्षेअभावी मुंबईकरांच्या जीवाला असलेला धोका पुन्हा एकदा अधोरेखित झाला असून, रेल्वे प्रशासनाने तातडीने कठोर उपाययोजना करण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे.



