मनोज जरांगे पाटील यांचा गंभीर आरोप : धनंजय मुंडेंनी माझ्या हत्येची सुपारी दिली, अडीच कोटींची डील झाल्याचा दावा

मराठा आरक्षण चळवळीचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्रात मोठा गौप्यस्फोट केला आहे. त्यांनी थेट राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आपल्या हत्येचा कट रचल्याचा गंभीर आरोप केला आहे. या प्रकरणी जालना पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली असून, पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे.
जरांगे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, बीड जिल्ह्यातील कांचन नावाचा कार्यकर्ता जो धनंजय मुंडे यांचा पीए आहे, त्याने काही आरोपींसह परळी येथील रेस्ट हाऊसमध्ये बैठक घेतली. या बैठकीत दोन कोटी रुपयांची डील ठरली, अशी माहिती त्यांनी दिली. संभाजीनगरच्या झालटा फाटा येथे मुंडे यांनी आरोपींची एक तास वाट पाहिली आणि त्यांना गोळ्या पुरवण्याचे आश्वासन दिले, असा आरोप जरांगे यांनी केला.
जरांगे यांच्या मते, या कटात अंतरवली परिसरातील बडे नावाची व्यक्ती यासह एकूण १० ते ११ जण सामील आहेत. तसेच त्यांच्या वाहनाला दुसऱ्या वाहनाची धडक देऊन अपघाताच्या स्वरूपात हत्या करण्याची योजना आखण्यात आल्याचाही दावा त्यांनी केला आहे.
मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला शांततेचे आवाहन करत सांगितले, “तुम्ही मी आहे तोपर्यंत टेन्शन घ्यायचं नाही. हे सत्य बाहेर आल्यामुळे सगळे जागे होतील.”
या प्रकरणाने राज्यातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. राज्यातील काही मंत्र्यांनी या आरोपांची चौकशी करून योग्य ती कारवाई व्हावी, अशी मागणी केली आहे.



