AmravatiLatest News

“सफाई अपनाओ, बिमारी भगाओ” अभियानांतर्गत वृक्षारोपण व स्वच्छता जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न

अमरावती : केंद्र सरकारच्या “सफाई अपनाओ, बिमारी भगाओ” या अभियानाच्या पार्श्वभूमीवर आज उत्तर झोन क्र. १ अंतर्गत रामपुरी कॅम्प प्रभाग क्र. ३ नवसारी येथे वृक्षारोपण व स्वच्छता जनजागृती कार्यक्रम उत्साहात पार पडला. हा कार्यक्रम अमरावती महानगरपालिका स्वच्छ भारत अभियान, महेंद्र कॉलनी संचालित अहिल्या महिला आरोग्य समिती, अंकुर होलीनेस फाउंडेशन, आणि विद्याभारती महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात मनपा शाळा क्र. १८ मधील विद्यार्थ्यांसोबत “स्वच्छ हात” या विषयावर सादरीकरणाने झाली. विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेबाबत जागरूकता निर्माण करत त्यांना योग्य सवयी अंगीकारण्याचे महत्त्व सांगण्यात आले.
यानंतर शहरी आरोग्य केंद्र, महेंद्र कॉलनी येथे वृक्षारोपण व वृक्षवाटप कार्यक्रम पार पडला. यावेळी अमरावती महानगरपालिकेच्या सन्माननीय अतिरिक्त आयुक्त सौ. शिल्पा नाईक प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. त्यांचे वृक्ष देऊन स्वागत करण्यात आले. त्यांनी स्वतः वृक्षारोपण करून कार्यक्रमाची सुरुवात केली आणि विद्यार्थ्यांना आपल्या हस्ते वृक्ष वाटप केले.

आपल्या मार्गदर्शनपर भाषणात त्यांनी सांगितले, “वृक्षारोपण व संवर्धन ही काळाची गरज आहे. पर्यावरण रक्षणासाठी प्रत्येकाने एक झाड लावून त्याचे संगोपन करणे आवश्यक आहे. तसेच आशा वर्कर्सनी घरोघरी जाऊन स्वच्छतेविषयी जनजागृती करावी.”

या उपक्रमात सहायक आयुक्त नंदकिशोर तिखीले, शहर समन्वयक श्वेता बोके, जेष्ठ स्वास्थ निरीक्षक राजू डिक्याव, अ‍ॅड. नीलिमा भूत (अध्यक्ष, अंकुर होलीनेस फाउंडेशन), प्राचार्य प्रा. प्रज्ञा येनकर (विद्याभारती महाविद्यालय), डॉ. पी. जे. बनसोड, एच. डी. डॉ. मुंदडा यांच्यासह अनेक मान्यवर आणि सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, शिक्षक, प्राध्यापक, आरोग्य सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अहिल्या महिला आरोग्य समितीच्या सचिव संध्या पाटील, आरोग्य सेविका वैशाली सुरोशे, प्रवीण आठवले, निलेश गाडे, सौरभ शेंद्रे, डॉ. मोनाली संदीप, प्रा. आर. जे. गजबे (NCC), तसेच शाळेतील शिक्षक, विद्यार्थी, आशा वर्कर्स, स्वच्छता निरीक्षक, आणि स्थानिक नागरिकांनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेबाबत जागरूकता निर्माण करणे, पर्यावरणसंवर्धनासाठी वृक्षारोपणाला चालना देणे, आणि “सफाई अपनाओ, बिमारी भगाओ” या राष्ट्रीय अभियानाची प्रभावी अंमलबजावणी स्थानिक पातळीवर सुनिश्चित करणे हा होता.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button