Latest News

मराठी भाषेबाबत तडजोड करणार नाही, मराठीची गळचेपी सहन करणार नाही : एकनाथ शिंदे

मुंबई : मराठी भाषेबाबत आपण कधीही तडजोड सहन करणार नाही, मराठीची गळचेपी सहन करणार नाही असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. मराठी माणसाच्या उद्धारासाठी जे काही करायचं ते आपण करणार, दिलेला शब्द आपण पाळतो त्यामुळे मराठी माणूस आपल्यासोबत आहे असंही शिंदे म्हणाले. मुंबईत शिवसेनेच्या कार्यकारिणीची बैठक पार पडली. मराठी माणसाच्या हक्कासाठी शिवसेना नेहमी आग्रही असल्याचा ठराव त्यामध्ये संमत करण्यात आला.

एकनाथ शिंदे यांची शिवसेनेच्या मुख्य नेतेपदी निवड करण्यात आली. त्यावेळी शिंदेंनी कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना कानमंत्र दिला. आपल्यात शिवसैनिक हे पद सर्वात मोठं आहे हे लक्षात ठेवा. कार्यकर्ता हा नेता तयार करतो, पक्ष घडवतो . त्यामुळे कार्यकर्त्याला जपले पाहिजे असं शिंदे म्हणाले.

नेता, आमदार, मंत्री झालो ही हवा डोक्यात जाऊ देऊ नका, कायम कार्यकर्ता म्हणूनच काम करा असा सल्ला एकनाथ शिंदे यांनी दिला. एकटा माणूस मोठा होऊन पक्ष मोठा होत नाही. कार्यकर्त्याला मोठं केलं की पक्षही आपोआप मोठा होतो असंही ते म्हणाले.

मंत्र्यांना शिंदेंच्या कानपिचक्या
एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या भाषणात शिवसेनेच्या मंत्र्यांना आणि आमदारांना कानपिचक्या दिल्या. ते म्हणाले की, आपण कमी बोलू आणि जास्त काम करू तेवढं चांगलं. विरोधकांना एक्स्पोज करताना स्वतः एस्पोज होऊ नका. तुमचा चुकीचा शब्द पक्षाला अडचणीत आणतो. आपण एवढं मोठं यश मिळवलं ते चुकीचं बोलून घालवू नका. शिस्तीला तडा जाईल असं काही करू नका. केलेल्या कामांची ब्रेकिंग न्यूज व्हायला पाहिजे.

शिवसेनेत निवडणुका होणार
एकनाथ शिंदे म्हणाले की, “शाखाप्रमुखापासून तर मुख्य नेत्यापर्यंत सर्वांनाच निवडणुकीला सामोरे जावे लागणार आहे. पक्षाचे सक्रिय सदस्य हेच मतदार असतील. डिजिटल म्हणजे ऑनलाईन पद्धतीने आणि प्रत्यक्ष मतदान पद्धतीने अशा 7 टप्प्यात ही निवडणूक होणार आहे. कुठेही लपवाछपवी नाही, किंवा कुणाचे नेतृत्व लादण्याचा प्रयत्न होणार नाही. ही निवडणूक ऐतिहासिक होणार आहे. संपूर्ण पारदर्शक पद्धतीने, निःपक्षपाती पद्धतीने निवडणुका होतील. मी मुख्य नेता असलो तरी आज निवडणुकीला रीतसर सामोरा जाणार. शाखाप्रमुख असो किंवा मुख्यनेता लोकशाहीत सगळेच समान आहे.”

एकनाथ शिंदे म्हणाले की, “निवडणुकांसाठी सज्ज व्हा, एकदिलाने काम करायचंय, निवडून येण्याची क्षमता असलेला उमेदवार हवा. उमेदवार चुकला की संपलं. जास्तीत जास्त सदस्य नोंदणी करा. नोंदणी करताना प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी उद्दिष्ट ठरवून नोंदणी करा. शाखेचं जाळं बाळासाहेबांनी, दिघेसाहेबांनी घट्ट केलं आहे. शाखा ही लोकांना आधार वाटते. कंटेनर शाखेचा कॉन्सेप्ट ठिकठिकाणी राबवा. ‘घर तिथे शिवसैनिक आणि गाव तिथे शाखा’ ही झालीच पाहिजे.”

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button