दारूच्या वादातून मित्रानेच मित्राचा जीव घेतला

अकोला : अकोल्यातील जुने शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या रमाबाई आंबेडकर नगरात पुन्हा एकदा दारूच्या वादातून झालेल्या खूनाची खळबळजनक घटना समोर आली आहे. प्रकाश पप्पू जोसेफ (रा. रमाबाई नगर) या युवकाचा त्याचाच मित्र पवन विलास मोरे याने दगडाने ठेचून खून केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
दोघेही एकाच भागात राहणारे आणि नियमितपणे एकत्र दारू सेवन करणारे होते. त्यांच्या नात्यातील वाद हे नवीन नसून, प्रकाश जोसेफ हा नेहमी मद्यधुंद अवस्थेत शिवीगाळ करायचा, त्यामुळे पवन मोरे सतत त्रस्त होता. आज पुन्हा एकदा वाद विकोपाला गेल्यावर पवनने आपला संयम सोडला आणि रागाच्या भरात मोठा दगड उचलून थेट प्रकाशच्या डोक्यात फेकून मारला. या जोरदार दगडफेकीत प्रकाशचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच जुने शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार नितीन लेव्हरकर आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले. या दरम्यान आरोपी पवन मोरे हा घटनास्थळावरून पलायन करण्याच्या तयारीत होता, मात्र पोलिसांनी तत्काळ कारवाई करत त्याला ताब्यात घेतले.
सध्या या घटनेचा सखोल तपास सुरु असून, पोलीस विभाग आरोपीकडून अधिक माहिती घेत आहे. स्थानिकांमध्ये या घटनेमुळे भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.



