5 महिन्यांपासून आहे मानधन थकीत| नागपूरमध्ये आशा वर्कर्स आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांचं जोरदार आंदोलन

नागपूर – पाच महिन्यांपासून थकीत मानधन, घरखर्च चालवण्यासाठी पैसे नाहीत, औषधं घेण्याचीही मारामार… अशा परिस्थितीत देशाच्या आरोग्य व्यवस्था सावरणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना अखेर रस्त्यावर उतरावं लागलं आहे.
बुधवारी नागपूरच्या संविधान चौकात CITU (सीटू) च्या नेतृत्वाखाली हजारो आशा वर्कर्स, गटप्रवर्तक आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांनी जोरदार धरणे आंदोलन छेडलं. त्यांच्या मुख्य मागण्या केंद्र शासनाकडून रखडलेला निधी त्वरीत वितरित करणे आणि थकीत मानधनाचा तातडीने निर्वाळा करणे या होत्या.
डिसेंबर २०२४ पासून निधी नाही, कर्मचाऱ्यांचे जगणं थांबले!
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत महाराष्ट्रभर हजारो महिला कंत्राटी पद्धतीने आरोग्यसेवा देत आहेत. मात्र डिसेंबर २०२४ पासून केंद्र शासनाकडून निधीच आलेला नाही. राज्य सरकारने फेब्रुवारीपर्यंतचा निधी दिला असला, तरी तो अपुरा ठरत आहे. परिणामी, कर्मचाऱ्यांचे पाच महिन्यांचे मानधन थकीत झाले असून त्यांची आर्थिक अवस्था ढासळली आहे.
“२-३ हजारात २४ तास सेवा… तरीही आम्ही थकीत?”
आंदोलनात सहभागी अनेक महिलांनी सरकारच्या उदासीनतेवर रोष व्यक्त केला. “आम्हाला २-३ हजार रुपयांमध्ये २४ तास काम करावं लागतं. तरीही महिनोन्महिने पगार थकीत ठेवणं हा अन्याय नाही का?” असा प्रश्न कर्मचाऱ्यांनी उपस्थित केला. “घर चालवायचं कसं? औषधं घ्यायचे पैसे नाहीत…” अशा शब्दांत त्यांनी आपल्या वेदना मांडल्या.
सरकारवर रोष, पुढील टप्प्यात राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा
या आंदोलनात सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. कर्मचाऱ्यांनी स्पष्ट इशारा दिला की, “जर निधी लवकरच मिळाला नाही, तर पुढच्या टप्प्यात राज्यभर आंदोलन छेडले जाईल आणि आरोग्य सेवा ठप्प केली जाईल.”



