१५ लाख नागरिकांना शकुंतला रेल्वेच्या ब्रॉडगेजची प्रतीक्षा!

अचलपूर-मूर्तिजापूर रेल्वेचा प्रवास थांबला; फिनले मिल बंद, जिल्ह्याचा दर्जाही रखडला… अचलपूरच्या विकासाचे प्रश्न पुन्हा ऐरणीवर
अचलपूर : अमरावती जिल्ह्यातील सर्वात मोठ्या अ वर्ग नगरपालिकेचा दर्जा असलेल्या अचलपूर शहराच्या विकासाचे अनेक प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत. एकेकाळी व्यापार, उद्योग आणि दळणवळणाचे महत्त्वाचे केंद्र म्हणून ओळख असलेल्या अचलपूरची परिस्थिती आज मात्र वेगळी झाली आहे. अचलपूर-मूर्तिजापूर दरम्यान धावणारी ऐतिहासिक शकुंतला रेल्वे बंद पडल्याने या मार्गावरून प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. या रेल्वेचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर व्हावे, अशी गेल्या अनेक वर्षांपासून नागरिकांची मागणी असून, विविध आंदोलने आणि पाठपुरावा करूनही हा प्रश्न अद्याप मार्गी लागलेला नाही. त्यामुळे परिसरातील सुमारे १५ लाख नागरिकांना शकुंतला रेल्वेच्या ब्रॉडगेजची प्रतीक्षा कायम आहे.

ब्रिटिशकालीन वारसा असलेली शकुंतला रेल्वे अचलपूर ते मूर्तिजापूर या मार्गावर धावत होती. ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिकांसाठी ही रेल्वे म्हणजे स्वस्त आणि सोयीस्कर प्रवासाचे साधन होते. त्यामुळे तिला परिसरातील नागरिकांकडून ‘गरीबांचा रथ’ असेही संबोधले जात होते. मात्र, कालांतराने रेल्वेसेवा बंद झाल्याने या मार्गावरील प्रवाशांच्या दळणवळणाचा महत्त्वाचा पर्याय हिरावला गेला. आज या ऐतिहासिक रेल्वेची आठवण आणि तिच्या पुनरुज्जीवनाची अपेक्षा एवढेच नागरिकांच्या वाट्याला आले आहे.

शकुंतला रेल्वेचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर करण्यासाठी अनेक वर्षांपासून विविध स्तरांवर मागण्या करण्यात आल्या. नागरिक, सामाजिक संघटना आणि लोकप्रतिनिधींनी आंदोलनांच्या माध्यमातून शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रत्यक्ष कामाला सुरुवात होऊन रेल्वे धावण्याचे स्वप्न अद्याप पूर्ण झालेले नाही. या रेल्वेमुळे अचलपूर, परतवाडा, अंजनगाव सुर्जी, दर्यापूर तसेच परिसरातील ग्रामीण भागातील नागरिकांना मोठा फायदा होऊ शकतो. ब्रॉडगेज झाल्यास प्रवासाच्या सुविधा वाढण्यासोबतच व्यापार, उद्योग, रोजगार आणि पर्यटनालाही चालना मिळण्याची अपेक्षा आहे.

दुसरीकडे, अचलपूर जिल्हा निर्मितीचा प्रश्नही अनेक वर्षांपासून चर्चेत आहे. स्वतंत्र जिल्ह्याचा दर्जा मिळावा, ही स्थानिक नागरिकांची मागणी असून, त्यासंदर्भातील प्रस्ताव आणि अपेक्षा अद्याप प्रत्यक्षात उतरलेल्या नाहीत. जिल्हा निर्मितीचा विषय जणू फाईलमध्येच अडकून पडल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.
अचलपूरच्या औद्योगिक विकासालाही मोठा धक्का बसला आहे. परिसरातील एकेकाळची महत्त्वाची औद्योगिक ओळख असलेली फिनले मिल बंद पडल्याने हजारो कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला. उद्योगधंदे बंद पडणे, रोजगाराच्या संधी कमी होणे आणि दळणवळणाच्या सुविधा रखडणे, अशा अनेक समस्यांचा सामना अचलपूर परिसराला करावा लागत आहे. त्यामुळे स्थानिक तरुणांना रोजगारासाठी इतर शहरांकडे धाव घ्यावी लागत असल्याचे चित्र आहे.
विशेष म्हणजे, एकेकाळी धावत्या रेल्वेमुळे गजबजलेले रेल्वे स्थानक आज शांत झाले आहे. रेल्वेसेवा बंद असली तरी आरक्षणाची खिडकी मात्र शिल्लक असल्याचे चित्र या व्यवस्थेची सद्यस्थिती अधोरेखित करणारे आहे. रेल्वे सुरू होण्याची आशा बाळगून असलेल्या नागरिकांसाठी हे चित्र वेदनादायी ठरत आहे.
शकुंतला रेल्वे पुन्हा धावणार कधी? अचलपूरला जिल्ह्याचा दर्जा कधी मिळणार? बंद पडलेल्या उद्योगांना पुन्हा उभारी कधी मिळणार? असे अनेक प्रश्न आज अचलपूरकरांसमोर उभे आहेत. याच पार्श्वभूमीवर सिटी न्यूजने अचलपूरमधील नागरिक आणि पत्रकारांशी विशेष संवाद साधला. शकुंतला रेल्वेच्या ब्रॉडगेजसंदर्भात त्यांच्या नेमक्या अपेक्षा काय आहेत, शासनाकडून कोणत्या उपाययोजना व्हाव्यात आणि अचलपूरच्या विकासाला गती देण्यासाठी काय करणे आवश्यक आहे, याबाबत त्यांनी आपली मते मांडली.
आता तरी शासन आणि रेल्वे प्रशासनाने या ऐतिहासिक रेल्वेच्या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन ब्रॉडगेजचे काम मार्गी लावावे, अशी अपेक्षा अचलपूरसह संपूर्ण परिसरातील नागरिक व्यक्त करीत आहेत.



