BuldhanacitynewsFarmersCrisis

पावसाअभावी बुलढाण्यात हळद पीक संकटात; पिके करपू लागल्याने शेतकरी हवालदिल!

एकरी लागवडीसाठी सुमारे एक लाखांचा खर्च; विहिरींनीही गाठला तळ, तूर पिकालाही पाणीटंचाईचा फटका

बुलढाणा | सिटी न्यूज, गजानन राऊत

बुलढाणा जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने हळद उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. पावसाअभावी जमिनीतील पाण्याची पातळी खालावली असून अनेक शेतकऱ्यांच्या विहिरींनीही तळ गाठला आहे. परिणामी, पाण्याअभावी हळदीची पिके सुकून करपू लागली आहेत. मेहनत आणि मोठा खर्च करून उभे केलेले पीक डोळ्यांसमोर वाळत असल्याने शेतकरी चिंतेत आहेत.

हळदीच्या लागवडीपासून संगोपनापर्यंत एकरी सुमारे एक लाख रुपयांचा खर्च येत असल्याचे शेतकरी सांगतात. एवढा मोठा खर्च करून उभे केलेले पीक पाण्याअभावी हातातून जाण्याची भीती निर्माण झाली आहे. आधीच शेतीच्या वाढत्या खर्चामुळे अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांसमोर आता आर्थिक संकट उभे राहिले आहे. विहिरींमध्ये पाणी नसल्याने पिकांना पाणी द्यायचे तरी कुठून, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.

पिके वाचवण्यासाठी काही शेतकरी टँकरद्वारे विहिरींमध्ये पाणी टाकून सिंचनाचा प्रयत्न करीत आहेत. मात्र, हा पर्याय खर्चिक ठरत असून त्यातूनही पिकांना पुरेसे पाणी मिळणे कठीण झाले आहे. हळद पिकासोबतच तूर उत्पादक शेतकऱ्यांनाही पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. पाण्याअभावी तूर पिकेही करपण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

नोव्हेंबर महिना संपत आला तरी पावसाने पाठ फिरवल्याने शेतकऱ्यांची चिंता अधिकच वाढली आहे. पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना आता पावसाच्या आगमनाची आस लागली आहे. आणखी काही दिवस पावसाने दडी मारल्यास हळद उत्पादनात मोठी घट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button