citynewsMaharashtraNagpurPolice

पतंग उडवायला गेलेला चिमुरडा घरी परतलाच नाही! शेताच्या कुंपणातील वीजप्रवाहाने १४ वर्षीय प्रिन्सचा मृत्यू

जंगली जनावरांपासून पिकांच्या संरक्षणासाठी तारांच्या कुंपणात सोडला होता वीजप्रवाह; छोटी बोरी गावावर शोककळा

बुटीबोरी | प्रतिनिधी

पतंग उडवण्याच्या निरागस छंदासाठी घराबाहेर पडलेल्या १४ वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना बुटीबोरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. शेताच्या कुंपणात सोडलेल्या वीजप्रवाहाच्या संपर्कात आल्याने प्रिन्स पद्माकर पारखी (वय १४, रा. छोटी बोरी, बुटीबोरी) याचा विजेचा तीव्र धक्का बसून मृत्यू झाला. रविवार, १५ नोव्हेंबर रोजी सकाळी त्याचा मृतदेह शेतातील तारांच्या कुंपणाजवळ आढळून आला. या घटनेमुळे छोटी बोरी गावात शोककळा पसरली असून, पालकांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रिन्स नेहमीप्रमाणे पतंग उडवण्यासाठी घरातून बाहेर पडला होता. मात्र, संध्याकाळ होऊन रात्र झाली तरी तो घरी परतला नाही. त्यामुळे कुटुंबीयांची चिंता वाढली. नातेवाईक आणि ग्रामस्थांनी परिसरात त्याचा शोध घेतला; मात्र त्याचा कुठेही पत्ता लागला नाही. अखेर हतबल झालेल्या वडिलांनी बुटीबोरी पोलीस ठाण्यात धाव घेत मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली. पोलिसांनी तातडीने शोधकार्य सुरू केले.

दरम्यान, रविवारच्या सकाळी पोलीस आणि कुटुंबीयांनी पुन्हा छोटी बोरी परिसरात शोधमोहीम राबवली. यावेळी जुनी वस्तीजवळील एका शेतात प्रिन्सचा मृतदेह आढळून आला. संबंधित शेताभोवती जंगली जनावरांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी तारांचे कुंपण करण्यात आले होते. या कुंपणात वीजप्रवाह सोडण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. याच तारांच्या संपर्कात आल्याने प्रिन्सला विजेचा तीव्र धक्का बसला आणि त्याचा जागीच मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

हसतखेळत घरातून बाहेर पडलेला लाडका मुलगा पुन्हा कधीच परतणार नाही, या वास्तवाने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. घटनास्थळी आई-वडिलांचा आक्रोश पाहून उपस्थित ग्रामस्थांचेही डोळे पाणावले. एका निष्पाप बालकाचा अशा प्रकारे जीव गेल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे.

घटनेची माहिती मिळताच बुटीबोरी पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. शेताच्या कुंपणात वीजप्रवाह कोणी आणि कोणत्या उद्देशाने सोडला होता, याचा तपास पोलीस करीत आहेत. या प्रकरणी संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button