citynewsMaharashtraNagpur

नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सचा १५ नोव्हेंबरला दीपावली स्नेहमिलन व सत्कार सोहळा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रमुख उपस्थिती; विदर्भातील उद्योजक, व्यापाऱ्यांचा विविध पुरस्कारांनी होणार सन्मान

नागपूर (प्रतिनिधी) : विदर्भातील सुमारे १३ लाख व्यापाऱ्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सच्या वतीने रविवार, १५ नोव्हेंबर २०२६ रोजी दीपावली स्नेहमिलन व सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी ६.३० वाजता वर्धा रोडवरील हॉटेल रेडिसन ब्लू येथे हा कार्यक्रम पार पडणार आहे. या सोहळ्याला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नागपूरचे खासदार तथा केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. यावेळी ते विदर्भातील व्यापारी, उद्योजक आणि विशेषतः लघु व मध्यम व्यावसायिकांना मार्गदर्शन करणार आहेत.

व्यापार आणि उद्योग क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या तसेच सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या विदर्भातील मान्यवरांचा या सोहळ्यात विशेष पुरस्कारांनी गौरव करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत.

विविध पुरस्कारांनी मान्यवरांचा गौरव

यंदाच्या सोहळ्यात कुकरेजा इन्फ्रास्ट्रक्चर्सचे संचालक श्रवण कुकरेजा यांना प्रतिष्ठेचा ‘महाराष्ट्र भूषण पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार आहे. रोहित आयर्न अँड स्टील (इंडिया) प्रा. लि.चे संचालक रोहित अग्रवाल यांना ‘विदर्भ रत्न पुरस्कार’ देऊन गौरविण्यात येणार आहे.

तसेच श्री बैद्यनाथ आयुर्वेद भवन लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक सुरेश शर्मा, बटुकभाई ज्वेलर्सचे संचालक किशोर सेठ आणि राधिका इंटरप्रायजेसचे संचालक मोहन अग्रवाल यांना ‘जीवन गौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार आहे.

युवा आणि महिला उद्योजकांचाही सन्मान

उद्योजकतेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या युवा व्यावसायिकांना प्रोत्साहन देण्यासाठी आर. संदेश ग्रुपचे संचालक संदेश अग्रवाल, राघव इन्फ्रास्ट्रक्चर्सचे संचालक राघव मेघे, संचेती ग्रुपचे संचालक निर्भय संचेती आणि ए. व्ही. इंटरप्रायजेसचे संचालक वेदांत अग्रवाल यांना ‘युवा उद्योजक पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

महिला उद्योजकांच्या योगदानाची दखल घेत डेफोडिल इंग्रेव्हर्स (इंडिया) प्रा. लि.च्या संचालक राखी अग्रवाल यांना ‘महिला उद्योजक पुरस्कार’ प्रदान केला जाणार आहे. तर विशेष श्रेणीमध्ये राजेश्वर नागले यांना ‘बेस्ट आयटी सर्व्हिस पुरस्कार’ देऊन गौरविण्यात येणार आहे.

व्यापारी व उद्योजकांना उपस्थित राहण्याचे आवाहन

या दीपावली स्नेहमिलन सोहळ्याला चेंबरचे सर्व सदस्य, संलग्न व्यापारी संघटनांचे अध्यक्ष, सचिव व प्रतिनिधी तसेच विदर्भातील प्रशासकीय आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष स्वप्निल अहिरकर आणि मानद सचिव सीए हेमंत सारडा यांनी संयुक्तपणे केले आहे.

व्यापारी आणि उद्योजकांना एकत्र आणण्यासोबतच त्यांच्या कार्याचा गौरव करणे, नव्या व्यावसायिक संधींबाबत मार्गदर्शन करणे आणि व्यापार क्षेत्रातील परस्पर सहकार्य वाढविणे, हा या आयोजनामागील प्रमुख उद्देश असल्याची माहिती चेंबरचे मानद सचिव सीए हेमंत सारडा यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button